७ लाखाची घरे १३ लाखाला ही शुद्ध फसवणूक
पिंपरी दि. १७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू नागरिकांसाठी, कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करावी, रावेत येथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे ६ लाख ९५ हजार रु. किमतीत किवळे गृहप्रकल्पात घरे देण्यात यावीत, लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर घरांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिलाध्यक्ष वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, मनपा सदस्य किरण साडेकर सलीम डांगे, नरसिंग माने, माऊली भोसले, गजानन बाजड, कालिदास गायकवाड, सुनील भोसले, राजेश माने, संभाजी वाघमारे, जरीता वाठारे, तुकाराम माने, सखाराम केदार, अंबादास जावळे, अंजुबाई राठोड, जितेंद्र महाजन, संदीप कांबळे, भागवत नागपुरे, अमृत पाटील, शुभांगी चव्हाण, शमशुद्दीन शेख, युनूस बेग, मंगेश पालके, अश्विनी मालुसरे नंदू आहेर बरगल्ली गावडे यांचे सह शहर व जिल्ह्यातील कामगार, नागरिक उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड हि उद्योगनगरी, कामगार नगरी असून येथे घरांसाठी गरजू असणाऱ्या नागरिकांची, कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने महानगरपालिकेने निर्माण केलेली घरांची संख्या कमी असून १० हजारापेक्षा अधिक घरांच्या निर्मितीची गरज आहे. तसेच सन ऑगस्ट २०२० मध्ये महानगरपालिकेकडून रावेत येथे गृहप्रकल्प करण्यात येणार म्हणून नागरिकाकडून अर्ज मागविण्यात आले आणि ९३४ लाभार्थी निश्चित करण्यात आले. मात्र ५ वर्षे झाले तरी हा प्रकल्प झाला नाही मनपाला यात अपयश आले. म्हणून या लाभार्थ्यांची शुद्ध फसवणूक महानगरपालिकेने केलेले असून आता महानगरपालिका याच लाभार्थ्यांना याच किमतीत घरे न देता केवळ येथील प्रकल्पामध्ये १३ लाख रुपये किमतीमध्ये म्हणजे दुप्पट किमतीने घरे देण्याचा घाट घालत असून हे अत्यंत चुकीचे आहे.
महानगरपालिकेने केलेल्या चुकांचा भुर्दंड सामान्य सर्वसामान्य लाभार्थ्यांना का ? असा सवाल करत महानगरपालिकेने ठरलेल्या दरातच घरे देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली. पंतप्रधान आवास योजनेस मुदतवाढ दिल्याने हा लाभ ही या लाभार्थ्यांना देण्यात यावा तसेच डुडुळगाव येथील गृह प्रकल्पाची सोडत त्वरित काढण्यात यावी आदी मागण्या घेऊन शिष्टमंडळाने महानगरपालिका उपायुक्त अण्णा बोदडे, प्रकल्प कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांचेशी चर्चा केली.
या विषयावर लवकरच आयुक्तांशी चर्चा बैठक होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली. मनपा भावना समोर आल्यानंतर लाभार्थ्यांनी घर कधी देता घर ? मनपाच्या चुकामुळे आम्हाला भुर्दंड कशासाठी ? ७ लाखाचे १३ लाख कसे झाले ? आवास योजना आहे की भास योजना ? ५ वर्षे झाले अजून किती प्रतीक्षा करावी ? अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा देत आणि मागण्यांचे फलक घेऊन लाभार्थी व नागरिकांनी कामगारांनी आंदोलन केले.
house-Protest-front-of-Municipal-Corporation-affordable-houses