शहरात पिंपरी येथे होणाऱ्या पालखीच्या स्वागताच्या तयारीचा तसेच पालखी मार्गाचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घेतला आढावा
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी परतीच्या प्रवासाला निघाली असून या पालखीचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (१९ जुलै ) रोजी दुपारी होत आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाजवळील चौकात पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागप्रमुखांसोबत बैठक घेऊन तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, शिवराज वाडकर,अभिमान भोसले, सुनीलदत्त नरोटे, विजयसिंह भोसले, हेमंत देसाई, महेश बरिदे, चंद्रकांत मुठाळ, दिलीप भोसले, गणेश राऊत, संतोष दुर्गे, बाळू लांडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संबधित क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा शनिवारी (१९ जुलै ) रोजी पिंपरी गांव येथील भैरवनाथ मंदिर येथे मुक्काम असणार आहे.त्या अनुषंगाने पालखी मार्गावर स्वच्छता, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्रे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय साधून नियोजनबद्ध काम करावे अशा सूचना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी बैठकीत दिल्या.
रविवार २० जुलै रोजी पालखी पिंपरी येथून लिंकरोड भाटनगर मार्गे चिंचवडगाव,चिंचवड स्टेशन (पहिली विश्रांती)
के.एस.बी.चौक (दूसरी विश्रांती), लांडेवाडी चौक (दुपारचा मुक्काम), भोसरी,आळंदी रोड,मॅगझिन चौक,थोरल्या पादुका (तिसरी विश्रांती), धाकट्या पादुका मार्गे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर,आळंदी येथे मुक्कामी जाणार आहे.
तर सोमवारी २१ जुलै रोजी पालखी आळंदीहून देहूफाटा, डुडुळगाव ,नागेश्वर मंदीर मोशी, चिखली, तळवडे, विठ्ठलवाडी मार्गे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर देहू याप्रमाणे प्रवास करणार आहे.
महापालिकेच्या वतीने मार्गावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी,फिरते शौचालय, प्राथमिक उपचार केंद्रे, आणि रूग्णवाहिकेची व्यवस्था तसेच विद्युत विभागाकडून रस्त्यांवर प्रकाशयोजना, तात्पुरते एल.ई.डी.दिवे व सी.सी.टि.व्ही. यंत्रणा बसवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागासोबत समन्वयाने पर्यायी मार्ग आखण्यात येणार आहेत. तसेच, संबंधित क्षेत्रीय व संबंधीत अधिका-यांनी देहू संस्थानच्या विश्वस्त मंडळींशी समन्वय साधून पालखी मार्गावर आवश्यक त्या सोईसुविधा पुरवाव्यात असे निर्देश या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी अधिका-यांना दिले आहेत.