Mumbai : ओला, उबेर, रॅपिडो यांच्या भाडेवाढीवर सकारात्मक चर्चा; डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १४ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी


अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कळसकर यांच्यासोबत बैठक संपन्न

मुंबई, दि. २२ जुलै : ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा कंपन्यांकडून ऑटो, टॅक्सी व कॅब चालकांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी आणि भाडेवाढीच्या मागणीवर सकारात्मक तोडगा शोधण्यासाठी आज परिवहन आयुक्त कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठक सायंकाळी ५ वाजता अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये देशभरातील १४ प्रमुख ऑटो, टॅक्सी व ॲप आधारित चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या बैठकीस ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते उदय आंबोणकर, महाराष्ट्र ॲप बेस युनियनचे अध्यक्ष प्रशांत उर्फ बंटी सावडेकर, मा. साहेब कॅब संघटनेच्या अध्यक्ष वर्षाताई शिंदे पाटील, कामगार संघांचे प्रतिनिधी रिजवान शेख, बिरुदेव पालवे व मनसे वाहतूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कंपन्यांनी शासन ठरवलेल्या दरांपेक्षा कमी दरात प्रवासी वाहतूक करून चालकांचे आर्थिक शोषण केले जात असल्याबाबत सखोल चर्चा झाली. यावर अतिरिक्त परिवहन आयुक्त भारत कळसकर यांनी संबंधित कंपन्यांकडून भाडेवाढीबाबत लेखी म्हणणे मागवले असून, ते २३ जुलै रोजी प्राप्त झाल्यानंतर त्वरित संघटनांसमोर सादर करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने परिवहन मंत्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच संबंधित विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले.

बैठकीनंतर मा. साहेब कॅब संघटनेच्या अध्यक्ष वर्षा शिंदे यांनी सांगितले की, "भाडेवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, चालक वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे." तसेच, प्रशांत सावडेकर यांनी याचबाबत सांगितले की, "येणाऱ्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यभरातील सर्व संघटनांची एकत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल."

रिजवान शेख यांनी स्पष्ट केले की, "आम्ही आंदोलन थांबवून लोकशाही मार्गाने सरकारकडे न्याय मागत आहोत. सरकारने लक्ष दिल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे."


अधिक माहितीसाठी संपर्क:

डॉ. बाबा कांबळे

राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत

मो. ९८५०७३२४२४

थोडे नवीन जरा जुने