पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रारूप विकास आराखड्याच्या (डी. पी.) विरोधात थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर, रहाटणी येथील नागरिकांनी उभारलेल्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या साखळी उपोषणाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी २२ जुलै रोजी भेट दिली आणि आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.
१६ जुलैपासून सुरू असलेल्या या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कोळसे पाटील म्हणाले,"हे सरकार उपोषण ऐकणारे नाही, यांना फक्त मनगटाची भाषा समजते. त्यामुळे उपोषण थांबवून मोठा लोकलढा उभा करा. हे सरकार बिल्डर व भांडवलदारधार्जिणे असून जनतेच्या हिताची कोणतीही तमा ठेवत नाही."
त्यांनी आंदोलनकर्त्या धनाजी येळकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषण तात्पुरते स्थगित करून एक भव्य जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
कोळसे पाटील पुढे; म्हणाले की,"या घरांवर लादलेल्या डी. पी. विरोधात महिलांचा पुढाकार हवा. मी तुमच्यासाठी मारायलाही तयार आहे. शपथ घ्या – हा डी. पी. होईल तर आमच्या मढ्यावरूनच! प्रत्येकाने पुढे येऊन संघर्ष केला पाहिजे."
ते पुढे म्हणाले की रिंगरोड आणि रस्त्यांच्या नावाखाली घरांवर टाकलेले बोजे थांबवण्यासाठी मोठे लोकआंदोलनच हाच एक उपाय आहे.
मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी जाहीर केले की, "आज उपोषण स्थगित करत असलो तरी लढा प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय थांबणार नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर १६ ऑगस्टपासून 'चले जाव' चळवळ सुरू करू आणि महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू."
येत्या काळात निषेध म्हणून घरावर काळे झेंडे लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवाजी इबीतदार, मनोज पाटील, देवेंद्र भदाणे, गौरव धनवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राहुल कलाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे संजोग वाघेरे पाटील, तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये राजश्री शिरवळकर, अर्चना मेंगडे, पल्लवी साळुंखे, यशोदा पवार, फरिदा कुरणे, प्रतिभा कांबळे आदींचा समावेश होता.
मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले असून लढा अधिक तीव्र करण्याची तयारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.