- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा अंतर्गत मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ता विकसित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावा लागणार आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या कामाला गती मिळेल, असे चित्र आहे.
मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दतील रस्ते आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हस्तांतरित करावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी सातत्त्याने लावून धरली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बैठक झाली. त्यावेळी मंत्री महोदय यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आदेश दिले होते.
वन विभागाकडून डुडुळगाव येथील गट नं. १९० (चऱ्होली फाटा ते डुडुळगाव) मधील मंजूर विकास योजनेतील २४ मीटर रस्ता विकसित करण्यसाठी ०.८३२१ हे. क्षेत्र हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तसेच, गट. नं. ७८ पै. (तळेकर पाटील चौक ते साईनाथ चौक) येथील मंजूर विकास योजनेतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी ०.५२१ हे. क्षेत्र मागणी केली आहे. त्यासाठी वनक्षेत्राचा दर्जा व क्षेत्राचा तपशील, या हद्दीतील कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया, वनभंग, संभाव्य वृक्षतोड, अभयारण्य, संरक्षित क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी बाबींचा स्वयंस्पष्ट अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो अहवाल उप वनसंरक्षण यांना पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी सदर पाहणी करण्यात आली.
यावेळी वन विभाग, महानगरपालिका स्थापत्य विभागाचे उप अभियंता सुशीलकुमार लवटे, सल्लागार रेवननाथ साखरे, वन परिक्षेत्र अधिकारी राजू वरक, वन परिमंडळ अधिकारी शितल खेंडके, वन रक्षक अशोक गायकवाड, वन मजूर लक्ष्मण टिंगरे, आमदार लांडगे यांचे सहकारी अनिकेत गायकवाड आदी उपस्थित होते.
मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आण्णाभाऊ साठे नगर येथील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता वन विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता महानगरपालिका प्रशासनाकडे विकासासाठी हस्तांतरीत करावा. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. प्रशासनाकडून स्थळपाहणी केल्यानंतर रस्ता हस्तांरणाची प्रक्रियेला गती देता येईल.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे