रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांसाठी परिवहन व उद्योग मंत्र्यांची शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई - ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड या संघटनांचे अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेण्यात आली. रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रकाश यशवंते आदी उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना करण्याचे आणि प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत
1. ओला, उबेर, रॅपिडो यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबवणे
कमी भाडे आणि जास्त कमिशनमुळे चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर धोरणे लागू करावीत. पुणे आरटीओ कमिटीने निश्चित केलेले नियम लागू करावेत.
2. सीएनजी बाटली पासिंगचे दर कमी करणे
सीएनजी बाटली पासिंगच्या वाढत्या किमती आणि सीएनजीच्या तुटवड्यामुळे चालकांचे नुकसान होत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
3. बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण
तीन आसनी रिक्षांमध्ये सहा किंवा त्याहून अधिक प्रवासी बसवून होणारी बेकायदेशीर वाहतूक थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी.
4. मुक्त रिक्षा परवाने बंद करणे
मुक्त रिक्षा परवाने बंद करून इलेक्ट्रिक वाहनांना परमिट प्रणालीत समाविष्ट करावे.
5. कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करून त्याचे लाभ चालकांना मिळवून द्यावेत. सह इतर विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “रिक्षा आणि टॅक्सी चालक हे समाजाचा कणा आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आम्हाला विश्वास आहे की, मंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील.”