Alandi : लोणकर विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमास उत्साही प्रारंभ; १०२ व्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हरिनामजयघोषाने वातावरण भारावले

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) – विद्यार्थ्यांमध्ये बुध्दी कौशल्य, स्मरणशक्ती वृद्धिंगत व्हावी आणि संत साहित्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी लोणकर विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा हरिनाम जयघोष करत शुभारंभ करण्यात आला.

शाळेतील १०२ व्या विद्यार्थ्यांनी श्रींची प्रतिमा, ग्रंथ व दीप पूजन करीत उत्साहात सहभाग घेतला. मुलांना मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

उपक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व ‘श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ह.भ.प. मारुती महाराज गलांडे अध्यक्षस्थानी होते.


उपक्रमाच्या निमित्ताने सादर केलेले विचार –

ह.भ.प. प्रतीक महाराज वाबळे यांनी मोबाईलच्या उपयोग व दुरुपयोगाची जाणीव करून दिली. ह.भ.प. बालाजी महाराज कुलथे यांनी सांप्रदायिक संस्कार लाभलेल्या व न लाभलेल्या विद्यार्थ्यांमधील फरक स्पष्ट केला. चांदगुडे महाराज यांनी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाला ज्ञानेश्वर राऊत, राजाभाऊ पठारे, ज्ञानेश्वर ताम्हाणे, मधुकर गायकवाड, कोद्रे, गोफणे, भोसले आदी स्थानिक मंडळींचे सहकार्य लाभले. अध्यक्षीय मनोगतात मारुती गलांडे यांनी संत साहित्य विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे उपयुक्त आहे, हे स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांच्या सहकार्याने शाळेला संत साहित्य, हरिपाठ, ज्ञानेश्वरी या संदर्भातील अभ्यासक्रम पुस्तके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन लोहकरे सर यांनी तर सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले.

सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने