नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशातील निवडणूक प्रणाली स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्याच्या उद्देशाने ३३४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा समावेश असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने १९५१ च्या लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या (RP Act) कलम २९ए अंतर्गत नोंदणीकृत पक्षांनी गेल्या सहा वर्षांत (२०१९ पासून) एकही निवडणूक न लढवल्यामुळे आणि त्यांचे कार्यालयीन पत्ते सत्यापित न झाल्यामुळे अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पिपल्स गार्डियन, दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षाने सलग सहा वर्षे कोणतीही निवडणूक (लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणूक) लढवली नाही, तर त्याची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. तसेच, पक्षाने आपला पत्ता, कार्यालय आणि पदाधिकाऱ्यांची माहिती आयोगाला नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे.
जून २०२५ मध्ये, आयोगाने देशभरातील ३४५ RUPPs च्या अनुपालनाची तपासणी करण्याचे निर्देश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) दिले होते.
महाराष्ट्रातील वरील नऊ पक्षांनी २०१९ पासून कोणतीही निवडणूक लढवली नसल्याचे आणि त्यांचे कार्यालयीन पत्ते सत्यापित करता आले नसल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
Election-Commission-cancels-recognition-of-nine-political-parties-in-Maharashtra