दुबईत मराठी उद्योजकांच्या जागतिक परिषदेचा उत्साहात शुभारंभ

Global-Marathi-Entrepreneurs-Conference-kicks-off-Dubai

दुबई : परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता जागतिक उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाऊल पुढे पडावे, मराठी उद्योजकांना व्यवसायासाठी जगभराची दारे उघडी व्हावीत, तसेच जगातील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य करावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इंटरपीनर दुबई 2025’ या परिषदेला दुबईत आज उत्साहात प्रारंभ झाला. जगभरातील मराठी उद्योजकांच्या प्रचंड प्रतिसादात हा उद्घाटन सोहळा पार पडला.

या परिषदेचे उद्घाटन भारत–दुबई, युनायटेड अरब इमिरातीचे वाणिज्यदूत सतीशकुमार स्वान, अल अली ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक एच.ई. याकुब अल अली, ज्येष्ठ विचारवंत व लेखक संदीप वासलेकर, ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत झाले.

सलग तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध क्षेत्रांतील यशस्वी मराठी उद्योजक तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून नवउद्योजकांना जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परिषदेचे संयोजक व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ‘गर्जे मराठी’चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू व पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी-चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, तसेच देश-विदेशातील विविध क्षेत्रांतील उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.

या भव्य परिषदेचे आयोजन गर्जे मराठी, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि सावा यांच्या वतीने करण्यात आले असून, मराठी उद्योजकांच्या जागतिक जाळ्याला बळकटी देण्याच्या दिशेने हा उपक्रम ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Global-Marathi-Entrepreneurs-Conference-kicks-off-Dubai

थोडे नवीन जरा जुने