PCMC : फेडरेशन ऑफ घरकुलचा स्तुत्य उपक्रम

 


पिंपरी चिंचवड : सोसायटी कामकाज प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिखलीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या घरकुल परिसरात एक महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे २५,००० लोकसंख्येचा आणि १५८ सोसायट्यांचा समावेश असलेल्या या परिसरात 'फेडरेशन ऑफ घरकुल', जिल्हा उपनिबंधक कार्यालय, पुणे व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी कामकाजविषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपनिबंधक मुकुंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "सोसायटी कामकाजाबाबत अनेक तक्रारी येतात. सभासद, सचिव, अध्यक्ष यांना आवश्यक प्रशिक्षण न मिळाल्याने गैरसमज व वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे असे कार्यक्रम प्रत्येक सोसायटीमध्ये राबवले गेले पाहिजेत."



शिबिरात सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सोसायटी ऑडिट प्रक्रिया, थकीत थकबाकी संदर्भातील कारवाई, आणि निवडणूक प्रक्रिया यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

ॲड. अजित बोराडे यांनी थकीत असलेल्या सोसायट्यांवर काय कारवाई केली जाते याबाबत माहिती दिली, तर लक्ष्मण इंदोरे यांनी ऑडिट प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले. विटकर यांनी सोसायटी निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष अशोक मगर यांनी सांगितले की, "घरकुल परिसरातील विविध भागांतून आलेले नागरिक सोसायटीमध्ये एकत्र आले असले तरी प्रशिक्षणाच्या अभावामुळे कामकाजात अडथळे येत होते. त्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत गरजेचे होते."

कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव दशरथ शिंदे यांनी केली, सूत्रसंचालन आबासाहेब गवळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी भुजबळ यांनी केले.

या वेळी फेडरेशनचे सर्व संचालक – सुजाता विधाते, निर्जला चौधरी, सुदामा जाधव, विनायकराव लाटे, युवराज निलवर्ण, संतोष दिवटे, अविनाश अनमोल, सुधाकर धुरी, दत्तात्रेय शिंदे, संजय बिर्जे, सतीश नागावकर – उपस्थित होते. नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

थोडे नवीन जरा जुने