पिंपरी चिंचवड - केशवनगर, विवेक वसाहत चौक, चिंचवड येथील उद्यम विकास बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांत तिनदा चेंबर बदलण्यात आले आहेत. पाच महिन्यांपूर्वी मोठा खर्च करून हे काम करण्यात आले होते. तरीही अतिवर्दळीच्या मुख्य रस्त्यावर इतक्या हलक्या दर्जाचे चेंबर बसवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थट्टा करण्यासारखे आहे. असे जनसेवक मधुकर बच्चे यांनी म्हटले आहे.
विशेषतः, हे चेंबर रस्त्याच्या मध्यभागी असून सतत वाहतुकीत असलेल्या ठिकाणी आहे. या ठिकाणी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी यापूर्वीही वारंवार पाठपुरावा करून कामाचा दर्जा सुधारण्याचा आग्रह केला होता. पण त्यानंतरही कामाच्या गुणवत्तेत कोणताही फरक पडलेला नाही.
गेल्या चार दिवसांत हे तिन्ही चेंबर पुन्हा खराब झाले असून, यामुळे आतापर्यंत १० ते १५ दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. उद्या या चेंबरमध्ये एखादी चारचाकी गाडी अडकली, किंवा मोठा अपघात घडला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिक करत आहेत.
या परिसरातील नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. पुन्हा तेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने, यामागे काही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची साठगाठ असल्याचा संशय व्यक्त होतो.
मागणी:
१) निकृष्ट चेंबर हटवून दर्जेदार व सुरक्षित चेंबर बसवण्यात यावे.
२) यामुळे झालेल्या अपघातांची नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्यात यावी.
३) पुढील काळात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी.
जर याची दखल प्रशासनाने घेतली नाही, तर नागरिकांकडून पुढील वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, याची नोंद घ्यावी.
असा इशारा केशवनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने मधुकर बच्चे यांनी दिला आहे.