पिंपरी चिंचवड - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिराज फाउंडेशन, वाकड येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, औंध आणि अभिराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत सोळंके (जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समन्वयक) आणि भाग्यश्री मोरे (नॅशनल ट्रस्ट लोकल लेव्हल कमिटी सदस्य) यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्या हस्ते मान्यवर व विद्यार्थ्यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खेडेकर यांनी केले, तर भाग्यश्री कापसे यांनी विद्यार्थ्यांना टिळक आणि साठे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. भाग्यश्री मोरे यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या निमित्ताने "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई" यांच्या सहयोगाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण आणि शिक्षकवर्गाने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी रमेश मुसूडगे (डायरेक्टर, अभिराज फाउंडेशन) यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.