PCMC : निगडी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹10 लाखांची मदत द्या! आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी.


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात आज, शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, आमदार अमित गोरखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून या घटनेची माहिती दिली.

या पत्रात त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आणि जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेत श्री. दत्ता होलारे, श्री. लखन धावरे, आणि श्री. साहेबराव गिरसेप या तीन निष्पाप कामगारांनी आपले प्राण गमावले. स्वातंत्र्यदिनासारख्या शुभ दिवशी त्यांच्या घरातील आधारस्तंभ गमावल्याने कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे.

गोरखे यांनी आपल्या पत्रात जखमींच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी अशीही मागणी केली आहे. यासोबतच, या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करून त्यांनी पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.



थोडे नवीन जरा जुने