पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - मागील ५ वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत ई क्लास रूम साठी ६० कोटी रुपये खर्च केले त्याच झाल काय?
• पुन्हा ४० कोटी रुपये खर्चाचा अट्टाहास कुणासाठी?
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या मराठी शाळा खाजगीकरणाचा घाट महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात आलेला आहे. या शाळांमध्ये शाळेसाठी नेमणूक करण्यात आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. खाजगीकरण केल्याने या शाळेतील मनुष्यबळ कमी होईल व एकतर्फी त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होईल. सध्या वस्तूस्थितीतील महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षण व त्यातील दर्जा उत्तम असून दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात खर्च करून शैक्षणिक साहित्य सुद्धा पुरविण्यात येते.
काही शाळांमध्ये असे निदर्शनास आलेले आहे कि शिक्षक व त्यांचा शिकवण्याचा दर्जा चांगला असल्यामुळे पटसंख्या सुद्धा वाढलेली आहे. महानगरपालिकेच्या वतीने अजून चांगल्या पद्धतीने नियोजन केले तर भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील शाळा अजून उत्तमरित्या उभ्या राहतील. मागील काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याचा निर्धार आपण केला होता. त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च आपण केलेला आहे किंवा त्यावर अजूनही काम चालू असल्याचे दिसत आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या शिष्टमंडळाने केला आहे.
महानगरपालिकेच्या शाळांचे खाजगीकरण तातडीने थांबवा.
आमच्या मनामध्ये प्रश्न आहे कि या ६० कोटी रुपयांचे काय झाले याची माहिती मिळावी व ही सर्व माहिती जनतेसमोर देण्यात यावी व स्मार्ट सिटी अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या निधीचा काय परिणाम मुलांवर झाला त्याची सर्व माहिती जनतेसमोर देण्यात यावी. पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी आपण ५ वर्षांसाठी ४१ कोटी रुपये खर्च करणार आहेत. पुन्हा एकदा हेच काम दिल्ली येथील एका खाजगी संस्थेला देण्यात येणार असल्याने त्याचा आम्ही निषेध करीत आहोत
आपल्या महानगरपालिकेच्या शाळामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या शाळांना राष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या बरोबरीला नेऊन ठेवले पाहिजे. तसेच याच मराठी शाळा या आपल्या मराठी भाषेचे तसेच संस्कृतीचे जतन करण्यात मोलाची भूमिका बजावतात. तरी आम्ही आपणास नम्र विनंती करीत आहोत कि आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महानगरपालिकेच्या मराठी शाळा या आपण जपल्या पाहिजेत व त्यांची उत्तमरित्या जोपासना केली पाहिजे व त्याचे खाजगीकरण होण्यापासून थांबविले पाहिजे.
सदर निवेदन उपशहर अध्यक्ष राजु सावळे यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले.
या शिष्टमंडळात सचिन चिखले - मनसे शहरअध्यक्ष, राजु सावळे, उपशहर अध्यक्ष, सिमा बेलापुरकर मनसे शहरअध्यक्ष, तुकाराम शिंदे चित्रपट सेना अध्यक्ष आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.