पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या अकरावीमधील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. त्याचे उद्घाटन पुणे विभागीय शिक्षण संचालक गणपत मोरे, व्याख्याते व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख,संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती खजिनदार डॉ . भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल कुमार शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी डॉ. पौर्णिमा कदम, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व ज्युनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, कला, वाणिज्य, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. वैशाली देशपांडे, प्रा.जस्मिन फरास, डॉ. सुनीता पटनाईक उपस्थित होते.
या सोहळ्याला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू , विद्यार्थी, व प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार स्मृतीचिन्ह देवून करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्याचे सादरीकरण केले .सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमांतर्गत प्रकल्प समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या नेतृत्वात सायबर वॉरियस पथकातील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा च्या आव्हानांना सामोरे कसे जायचे, याबाबत पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृती केली. तसेच उपस्थिताना यावेळी शपथ दिली.
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना मुख्य व्याख्याते इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, तूमचा दोन वर्षाचा कालावधी उमेदीचा व पराक्रमाचा आहे. भविष्यात ज्या क्षेत्रात आनंद मिळेल त्या क्षेत्रात जावा. मला असामान्य व्हायच आहे त्याची तयारी आतापासूनच करा. मोबाईलचा वापर सिमीत ठेवा. त्याच्या आहारी जाऊ नका. वेळ अमूल्य आहे याची सतत जाणीव ठेवा. आयुष्याच्या उत्पादक वेळ मोबाईलमध्ये मनोरंजनासाठी घालवला तर भविष्यकाळ अंधारात आहे याची जाणीव ठेवा. हिंसे पासून दूर राहा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला घडण्याची व बिघडण्याची दोन वाटा आहे, आपण कोणती वाट निवडतो यावर आपले भविष्य अवलंबून आहे याची खूण गाठ मनासी बाधा. आई-वडिलांच्या कष्टाला व त्याच्या निरपेक्ष जगण्याला न्याय द्या . प्रसंगी परिस्थितीवर मात करा. दिल, दोस्ती, दुनियादारीच्या भानगडीत पडू नका.
दुनियाच्या बाजारात तुम्हाला सिद्ध करा. मी काय होणार याचे ध्येय लिहून ठेवा. यासाठी आई-वडिलांची नजर डोळ्यांमध्ये घेत, सतत यशाच्या दिशेने आयुष्याचा प्रवास करा. तुम्ही उद्या पराक्रमी झालात तर जग तुमच्याकडे आदराने बघेल, यासारखी आई-वडिलांना दुसरी कोणतीच अनमोल भेट नाही. ती भेट देण्याचे चित्र सतत नजरेसमोर ठेवा. खऱ्या अर्थाने प्रतिभावंत व्हाल याच शुभेच्छा आजच्या मंगल समयी देतो .
पुणे विभागीय शिक्षण संचालक गणपत मोरे म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक असायला हवी. पालकांनी देखील आपल्या मताचे ओझे आपल्या पाल्यावर लादू नये. अनेक पालक आपल्या पाल्याची क्षमता, कौशल्य, शारीरिक व मानसिक स्थिती याबाबत विचार करीत नाही. मग अपेक्षित यश मिळाले नाही तर, मुले वेगळ्या वाटेला लागतात. पालकांना उद्देशून श्री. मोरे पुढे म्हणाले, मुलांना जबाबदार नागरिक नागरिक घडवायचा असेल तर , भाषा व इतिहासाची जाणीव त्याना असणे गरजेचे आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रत्येक मुलांमध्ये कष्ट करण्याची, जिद्द असून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. उज्वल भविष्यासाठी सातत्य, वेळेचे , अभ्यासाचे नियोजन करा. कष्टाची तयारी ठेवून जे कराल ते उत्कृष्ट करा. प्रत्येक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा .प्रसंग उद्भवलाच तर आई-वडिलांबरोबर चर्चा करा. त्याच्याशी गप्पा मारा. मनातील गोष्टी त्यांना सांगा. कमला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग विद्यार्थी केंद्रीत आहे. येथे गुणवत्ता पूर्वक विद्यार्थी धडविण्यासाठी सामुहिक प्रयत्न सातत्याने केले जात आहे. हेच आमचे ध्येय व स्वप्न आहे.
प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यानी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या गेल्या बारा वर्षाच्या प्रवाशाचे सुवर्णक्षण पालक व विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रवींद्र निरगुडे व प्रा. वर्षा निगडे यांनी केले तर आभार डॉ.अर्चना गांगड यांनी मानले .