Nepal Social Media Ban : नेपाल सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशात बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय संचार आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने (MoCIT) घेतला असून, यामागचे कारण म्हणजे या प्लॅटफॉर्म्सनी नेपालमध्ये आधिकारिक नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याच्या सरकारी नियमांचे पालन न केल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडिया कंपन्यांनी नोंदणी न केल्याने बंदी
नेपाळ सरकारने यापूर्वीही अनेक वेळा सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी सरकारने २८ ऑगस्ट २०२५ रोजी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, जो बुधवारी (३ सप्टेंबर २०२५) रात्री संपला. मंत्रालयाचे प्रवक्ते गजेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप), अल्फाबेट (यूट्यूब), आणि एक्स कॉर्प यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी नोंदणीसाठी कोणताही अर्ज सादर केला नाही. परिणामी, गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) मंत्रालयाच्या बैठकीत या अपंजीकृत प्लॅटफॉर्मवर तत्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बंदीचा परिणाम फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स, लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट, डिस्कॉर्ड, पिंटरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टंबलर, क्लबहाउस, रंबल, आणि इतर अनेक प्रमुख सोशल मीडिया आणि संचार प्लॅटफॉर्मवर होणार आहे.
कोणत्या प्लॅटफॉर्मना सूट?
काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ज्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, वाइबर, विटक, निम्बज, आणि पोपो लाइव्ह यांचा समावेश आहे. याशिवाय, टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी यांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले असल्याने त्यांनाही चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नेपाल सरकारने या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी नेपाल दूरसंचार प्राधिकरणाला (NTA) निर्देश दिले आहेत. NTA ने आता दूरसंचार कंपन्या आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) वापरकर्त्यांची या प्लॅटफॉर्म्सवर प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सरकारने टिकटॉकवर नोव्हेंबर २०२३ मध्ये बंदी घातली होती, परंतु ऑगस्ट २०२४ मध्ये टिकटॉकने नोंदणी केल्यानंतर ती बंदी उठवण्यात आली होती.
26 social media platforms including Facebook, X, YouTube banned in Nepal