मुंबई (Maharashtra Weather Update) : नवरात्राच्या तोंडावर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने मुसळधार ते अतिवृष्टीसमान पावसाचा इशारा जारी केला आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अनेक भागांत अद्याप सुरू असून, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अरबी समुद्र आणि दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर होणार आहे. यामुळे मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात पावसाचा जोर कमी, पण मराठवाड्यात धोका कायम
मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांत सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. हवामान विभागाने नाशिक, अहिल्यानगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदूरबार आणि वर्धा या दहा जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिवृष्टीसमान पावसाचा इशारा दिला आहे. या भागांत विजांचा कडकडाट, गडगडाट आणि ताशी 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांना पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे पूर, भूस्खलन आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांना पाणथळ जागा आणि नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मान्सून परतीच्या टप्प्यात विलंब
साधारणपणे 15 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या टप्प्यात प्रवेश करतो. मात्र, यंदा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
Heavy-rain-warning-in-Marathwada-and-Madhya-Maharashtra-before-Navratri