ओला-उबरच्या भाड्याला लगाम, प्रवाशांना दिलासा – १८ सप्टेंबरपासून नवे दर लागू


मुंबई (वर्षा चव्हाण) -अॅपवर आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ओला, उबरसारख्या सेवांसाठी परिवहन विभागाने नवीन भाडे धोरण जाहीर केले असून, १८ सप्टेंबरपासून हे दर अंमलात येणार आहेत. नवीन नियमानुसार, आता या सेवांसाठी प्रति किलोमीटर २२.७२ रुपये इतका निश्चित दर लागू केला जाणार आहे.

या निर्णयामुळे टॅक्सी प्रवास अधिक पारदर्शक व नियंत्रीत होणार असून, प्रवाशांच्या खिशाला बसणारी "कात्री" थांबणार असल्याची शक्यता आहे. मागणीनुसार भाडे ठरवण्याची मुभा ठेवण्यात आली असली तरी तीही ठराविक मर्यादेतच असेल.

# गर्दीच्या वेळी भाडे वाढणार, पण मर्यादेतच

नवीन धोरणानुसार, प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या गर्दीच्या वेळेत भाड्यात १.५ पट वाढ करता येणार आहे. त्यामुळे अशा वेळी प्रति किलोमीटर दर सुमारे ३४ रुपये होणार आहे. त्याउलट मागणी कमी असताना भाडे २५% कमी म्हणजेच सुमारे १७ रुपये प्रति किलोमीटर आकारता येईल.

# जुने दर होते बेफाम

यापूर्वी कंपन्यांकडून गर्दीच्या वेळेत प्रति किलोमीटर ४६ ते ४८ रुपये किंवा त्याहून अधिक भाडे आकारले जात होते. तर, मागणी नसलेल्या वेळेत कधी कधी १० रुपयांपेक्षाही कमी दर आकारले जात होते. त्यामुळे भाड्यात मोठी तफावत दिसून येत होती. आता या नव्या धोरणामुळे दोन्ही टोकांच्या दरांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

# प्रवाशांना आणि चालकांनाही दिलासा

हा निर्णय प्रवाशांना जिथे दिलासा देणारा आहे, तिथेच टॅक्सी चालकांच्या सततच्या आंदोलनांवरही तोडगा देणारा ठरतो आहे. निश्चित दरामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील वादही कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने