पिंपरी चिंचवड - वाकड, पुणे येथील आदिवासी शासकीय वसतीगृहातील दैनंदिन अडचणी, सुरक्षिततेचा अभाव तसेच इमारतीच्या जीर्ण अवस्थेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प) पिंपरी चिंचवड महानगर तर्फे आज (०५ सप्टेंबर २०२५) आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षा पासून सातत्याने मागणी करून सुद्धा वस्तीगृह इमारत बाबत चौकशी झाली नाही, त्यामुळे दि. ०४/०९/२०२५ रोजी, रात्री 11 वाजता आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह, वाकड येथील इमारत मध्ये काही स्लॅब प्लास्टर कोसळल्याची घटना घडली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण झालेले आहे.
ऑक्टोंबर 2023 मध्ये देखील अशी घटना घडली होती. त्यावेळी, अनिता पथवे विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली होती, प्रशासनाने घटनेच्या गांभीर्य समजून न घेता दुर्लक्षित केल्याने आज पुन्हा अशी घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे गृहपाल वसतीगृहात २४ तास उपस्थित राहणे अनिवार्य असून देखील, घटनास्थळी गृहपाल उपस्थित नव्हते.
गृहपाल व प्रकल्प कार्यालयाकडून वसतीगृहातील समस्यांना दुर्लक्षित करून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अभाविपला अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर लेखी स्वरूपात खालीलप्रमाणे आश्वासन देण्यात आले आहे.
1. Structural Audit: वसतीगृहाची इमारत सुरक्षित आहे का, याची खातरजमा करण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तृतीय पक्षामार्फत एका महिन्याच्या आत Structural Audit करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील इतर आदिवासी वसतीगृहांचीही तपासणी होणार आहे.
2. ठेकेदारावर कारवाई: ऑक्टोबर २०२३ मधील घटनेबाबत संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, ठाणे यांच्यामार्फत करण्यात येईल.
3. दुरुस्ती कामे: वसतीगृहातील स्लॅबचे प्लास्टर दुरुस्तीचे काम दोन दिवसांच्या आत सुरू करण्यात येईल.
4. गृहपाल चौकशी: मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती मंजुषा शंकर वायसे यांच्यावरील तक्रारींची चौकशी करून आवश्यक कार्यवाहीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांकडे शिफारस केली जाईल.
प्रशासनाकडून मिळालेल्या या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, अभाविप या सर्व बाबींवर वेळोवेळी पाठपुरावा करून आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत अभाविप पिंपरी चिंचवड महानगर मंत्री श्री.हिमांशु नागरे, महानगर सहमंत्री कार्तिक पवार, सोहेल शेख, विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंडे व महेंद्र भोये यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात अभाविपचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.