पिंपरी-चिंचवडमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भाजपचा 'सेवा पंधरवडा' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचे यशस्वी आयोजन
पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या जनहितकारी योजना आणि भाजपच्या राष्ट्रव्यापी अभियानांची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी 'सेवा पंधरवडा', 'आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान' आणि नुकत्याच जाहीर झालेल्या जीएसटी दरांमधील कपातीबद्दल सविस्तर माहिती दिली. पिंपरी येथील हॉटेल घरोंदा, मोरवाडी येथे आज पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्यासह आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, जीएसटी रिफॉर्म अभियान संयोजक मधुकर बच्चे, सहसंयोजक बबनराव डांगले, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे संयोजक राजू दुर्गे, व्यापारी आघाडीचे राजेंद्र चिंचवडे, कैलास कुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जीएसटी रिफॉर्म अभियान संयोजक मधुकर बच्चे, सहसंयोजक बबनराव डांगले, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे संयोजक राजू दुर्गे यांनी अभियानाविषयी माहिती दिली व सेवा पंधरवडा अभियानाच्या संयोजिका वैशाली खाडये यांनी झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' अभियान राबवले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या अभियानांतर्गत विविध सेवाभावी उपक्रम घेण्यात आले. यामध्ये ५० हून अधिक आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे तसेच स्वच्छता अभियानांचा समावेश होता. या शिबिरांमध्ये हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः, रक्तदान शिबिरांमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता, ज्यामुळे हे अभियान यशस्वी झाले, असे काटे यांनी नमूद केले.
काटे यांनी 'आत्मनिर्भर भारत' आणि 'जीएसटी रिफॉर्म' अभियानाचे महत्त्वही विशद केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे 'आत्मनिर्भर भारत' हे केवळ एक अभियान न राहता, आता ते एक जनआंदोलन बनले आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक मदत देणे आणि 'मेक इन इंडिया'ला गती देणे आहे.
यासोबतच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी दरांमधील कपातीचे काटे यांनी स्वागत केले. त्यांनी म्हटले की, हा 'नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म' मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेसाठी एक मोठी भेट आहे. या ऐतिहासिक दर कपातीमुळे सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांना विशेष प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, जीएसटी प्रणालीमुळे करसंकलनात वाढ झाली असून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या पंधरवड्यात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून लोकांची सेवा केली जात आहे. याचबरोबर, राज्यातील खास व्यक्तींचा आणि दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करून त्यांना आवश्यक उपकरणे वाटप केली जाणार आहेत. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले जाणार आहे. लोकांना पंतप्रधान मोदींच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती मिळावी, म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी आणि पुस्तकांचे वाटपही करण्यात येईल. 'विकसित भारत', 'आत्मनिर्भर भारत', 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल' यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचा प्रसार करणे, हा या कार्यक्रमाचा एक मुख्य उद्देश आहे. याशिवाय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन कार्याची माहिती दिली जात आहे आणि 'मोदी विकास मॅरेथॉन' सारख्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
यासोबतच, देशभरात आत्मनिर्भर भारत हा 90 दिवसांचा एक मोठा कार्यक्रम सुरू आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश भारताला सर्व बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे हा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मंडळांमध्ये स्थानिक मेळावे, शिबिरे आणि संमेलनांचे आयोजन केले जात आहे. तसेच, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी खादीच्या वस्तू खरेदी करण्यास आणि लोकांना त्या वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून या अभियानाचा व्यापक प्रचार केला जात आहे. हे दोन्ही कार्यक्रम देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मोदी सरकारच्या प्रमुख कल्याणकारी योजनांचीही माहिती दिली. 'आयुष्मान भारत' योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत, तर 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'ने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणे, 'जन धन' योजनेने कोट्यवधी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून आर्थिक समावेशनाला चालना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शहर प्रवक्ते कुणाल लांडगे यांनी केले. आभार सरचिटणीस विकास डोळस यांनी मांडले.