पहिल्यांदाच जनसंवाद आळंदीत स्वागत आणि कौतुक
आळंदी विकास कामांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : खेड आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यातील जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मतदार संघात विविध ठिकाणी जनसंवाद सभेचे आयोजन विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, नागरिक आणि आमदार यांच्यात थेट जनसंवाद अभियान सुरु केले. या लोकहितासाठीचे अभियानास आळंदीसह पंचक्रोशीतील नागरी, पदाधिकारी, अधिकारी यांचेतुन अभियानास उत्साही प्रतिसाद मिळाला. आळंदी पंचक्रोशीतून नागरिकांनी तसेच त्रस्त ग्रामस्थांनी थेट आमदार आणि उपस्थित अधिकारी यांचेशी संवाद साधत आपापल्या समस्यां, प्रश्न सोडविण्यासाठी मोठा प्रतिसाद देत जनसंवाद सभा यशस्वी केली.
या जनसंवाद सभेस माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील. रमेश गोगावले, सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, अविनाश तापकीर, विलास कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, संदीप नाईकरे पाटील, मनोज पवार, अनिकेत डफळ, मंगेश तिताडे, नंदकुमार वडगांवकर, महिला संघटक अनिता झुजम, माजी सरपंच काळुराम थोरवे, उमेश रानवडे, शिरीष कारेकर, शशिकांत जाधव, विविध शासकीय अधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदीत प्रथमच आयोजित उपक्रमाचे ग्रामस्थ, नागरिक, पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत, कौतुक करीत आमदार बाबाजी काळे यांचा या उपक्रमाचे आयोजना निमित्त सत्कार करीत असेच जनसंवाद सभेचे नियमित आयोजन झाल्यास लवकर विकास कामे, समस्यां, प्रश्न मार्गी लागतील असे सांगत उपक्रमास प्रतिसाद दिला. आमदार काळे यांनी या अभियाना मागील भूमिका सांगत संवाद साधला. अगदी प्रभावी पणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेत संबंधितांना त्यांनी सूचनादेश करीत नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यास सांगितले.
यावेळी अगदी मनमोकळ्या पणे आमदार बाबाजी काळे यांनी जनतेशी संवाद साधला. प्रश्न, समस्यां जाणून घेत थेट त्यावर कार्यवाही करण्यास संबंधित अधिकारी यांचा संवाद घडवून घडवून आणला. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्येक्ष सूचना देत, सुसंवादाची भूमिका जपत समस्यां ग्रस्त नागरिकांशी बोलत जनसंवाद सार्थ ठरविला. आळंदीत प्रथमच आमदार बाबाजी काळे यांनी उपक्रम राबवित नागरिकांची मने जिंकली. यावेळी नागरिकांनी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ च्या खेळाचे मैदानाचे तसेच वर्ग खोल्यांचे जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यासह परिसरातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कचरा समस्यां, रस्त्यावरील खड्डे, गटर्स, वीज मीटर जोड, तसेच वैयक्तिक घरकुल प्रश्न मांडत जनसंवाद बैठकीस प्रतिसाद देत आपापल्या समस्यां सोडविण्यास प्राधान्य दिले. पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद मिळाल्याने असे जनसंवाद बैठकीचे कार्यक्रम दर तीन महिन्यांनी घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले. जागेवर चहा नाश्टा करत आमदार बाबाजी काळे यांनी जनसंवाद बैठक नागरिकांचे प्रतिसादाने यशस्वी झाली. या उपक्रमात आळंदी नगरपरिषद, महसूल, पोलीस, वाहतूक पोलीस, वीज महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
आळंदी विकास कामांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
यावेळी येथील काँग्रेसचे युवानेते उमेश रानवडे यांनी थेट आमदार बाबाजी काळे यांना सवाल करीत आळंदी नगरपरिषदेच्या झालेल्या विविध विकास कामांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. यावर आमदार बाबाजी काळे म्हणाले, या मागणी संदर्भातील पुरावे आणि माहिती घेऊन तथ्य पाहून निश्चित मागणी केली जाईल असे सांगितले.