ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आंदोलनाची हाक
डॉ. बाबा कांबळे यांचे घोषणा , कृती समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रीय फेडरेशनचे उपाध्यक्ष आनंद तांबे होते उपस्थित
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महाराष्ट्रात सुमारे 20 लाख रिक्षा चालक-मालक आणि 7 लाखांहून अधिक टॅक्सी-कॅब चालक असूनही या घटकांवर सातत्याने अन्याय होत आहे. एक लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली जात आहे, ज्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गदा येत आहे. नवीन रोजगाराच्या नावाखाली ज्यांना पूर्वी परवाने दिले गेले, त्यांना बेरोजगार करण्याचे काम सरकार करत आहे. याविरोधात ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. बाबा कांबळे यांचा संदेश
ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या राजकारणामुळे गोरगरीब कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना, जे नेते त्यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा संदेश दिला आहे. याला प्रतिउत्तर देताना ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पराभूत करावे. या जातीपातीच्या राजकीय पाडापाडीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचे प्रश्न उपेक्षित राहत आहेत. या परिस्थितीत आम्हालाही आता राजकीय भूमिका घ्यावी लागेल. जे नेते टू-व्हीलर टॅक्सीला समर्थन देतील आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या विरोधात उभे राहतील, त्यांना आगामी महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पराभूत करा, असा संदेश डॉ. कांबळे यांनी दिला आहे.
मुख्य मागण्या, सविस्तरपणे
1. टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी देण्यात येऊ नये, कारण यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचा रोजगार धोक्यात येत आहे.
2. मुक्त रिक्षा परवाना बंद करावा आणि इलेक्ट्रिक रिक्षांना परवान्याच्या कक्षेत आणावे, जेणेकरून व्यवस्थित नियमन होईल.
3. कल्याणकारी मंडळावर रिक्षा चालकाची अध्यक्षपदी नेमणूक करावी, ज्यामुळे त्यांच्या हितांचे संरक्षण होईल.
4. प्रत्येक आरटीओमध्ये कल्याणकारी मंडळावर रिक्षा चालकांचे दोन प्रतिनिधी नियुक्त करावेत, जेणेकरून त्यांचा आवाज प्रभावीपणे मांडला जाईल.
5. ओला-उबेरसारख्या भांडवलदार कंपन्यांकडून रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांचे होणारे आर्थिक शोषण थांबवावे आणि त्यांना शासनाने ठरवलेल्या दराने हमी द्यावी.
9 ऑक्टोबर 2025: राज्यव्यापी बंद आणि आंदोलन
या अन्यायाविरोधात 9 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, कोल्हापूर, नाशिक, नागपूर यासह महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये रिक्षा, टॅक्सी आणि कॅब एकदिवसीय बंद ठेवून इशारा आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरातील मुख्य चौक आणि आरटीओ कार्यालयांपुढे निदर्शने केली जातील. हा एकदिवसीय इशारा आहे. यानंतरही सरकारने टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी रद्द न केल्यास तसेच रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांचे प्रश्न तातडीने न सोडवल्यास पुढील काळात बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.
आंदोलनाचा संदेश
9 ऑक्टोबर 2025 रोजी रिक्षा, टॅक्सी व कॅब **बंद! बंद! बंद!
या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देऊन रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी केले आहे.
पिंपरी येथे रिक्षा टॅक्सी व कॅब चालकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी ऑटो-टॅक्सी-ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंडा, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाट, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप आयर, इचलकरंजी येथील स्वामी बिलूर, ठाणे येथील राजू ढेकण, बदलापूर येथील प्रवीण भोसले, इलेक्ट्रिक मोशनचे सूर्या सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष जाफर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे, शहर कार्याध्यक्ष विशाल ससाने, बालाजी गायकवाड, उपाध्यक्ष पप्पू गवारे, संघटक दत्ता गेले, पुणे शहर कार्याध्यक्ष विलास पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, विशाल भोंडवे, प्रवीण शिखरे, अंथोनी फ्रान्सिस, गणेश कांबळे, डी मार्ट रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम, लोणावळा येथील बाबुभाई शेख, शहराध्यक्ष आनंद सदावर्ते, चाकण येथील कैलास नाना वालांडे, राजू शिंदे, पिंपळे सौदागर विभाग अध्यक्ष बबन काळे, अनिकेत कड, सोमनाथ येळवंडे, सिद्धार्थ साबळे, सोपान पवळे, किशोर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.