Pune : चांदणी चौक ते जांभुळवाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


वाघोली ते केसनंद, वाघोली ते आव्हळवाडी रस्त्याचे काम करण्याचेही निर्देश

मुंबई (क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगरपालिकेने या दोन्ही रस्त्यांच्या भूसंपादनासाठी जमीनधारकांसोबत तातडीने बैठक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

चांदणी चौक ते जांभूळवाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी रस्ता, वाघोली ते केसनंद,वाघोली ते आव्हळवाडी या रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

वाढत्या नागरीकरणामुळे पुणे शहरातील वाहतुकीवर ताण येत असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

वाघोली ते केसनंद, वाघोली ते आव्हळवाडी रस्त्याचे काम करावे

वाघोली ते केसनंद आणि वाघोली ते आव्हळवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता असला तरी, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता तातडीने तयार करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव विकास ढाकणे हे मंत्रालयातून तर आमदार माऊली कटके, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे दूरदृश्य संवादप्रणाली द्वारे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने