लडाख : लेहमध्ये हजारो नागरिकांनी लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा आणि त्यांच्या संविधानिक मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन करत होते. त्यांनी उपोषण आणि संपूर्ण लडाख बंदचे आवाहन केले होते.
मात्र या आंदोलनास हिंसक वळण लागलं. चिडलेल्या आंदोलकांनी लेह मधील भाजपचं कार्यालय फोडलं. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक देखील सुरू करण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांची गाडी देखील पेटवून दिली.
सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आज (24 सप्टेंबर) हिंसक बनल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जमावाने लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिले आहे. या घटनेने लेहमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लेह येथे झालेल्या हिंसक आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तरुण आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत 80 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यात 40 पोलिसांचा समावेश आहे. आंदोलकांनी भाजप व लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या कार्यालयांना तसेच अनेक वाहनांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे गोळे सोडले, लाठीचार्ज केला आणि गोळीबार केला. लेह शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवलं. असे करहून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा हटवला. त्यानंतर जम्मू-काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आळा. तर कारगिल आणि लेह मिळून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मागील तीन वर्षांपासून लडाखमधील लोक सातत्याने लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी करत आहेत. त्यांची जमीन, संस्कृती आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी तेथील लोक ही मागणी करत आहेत. याच मागणीसाठी सोनम वांगचुक हे मार्च 2025 रोजी उपोषणाला बसले होते. यानंतर आता सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली 15 विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.