सोसायटी फेडरेशनचा निर्धार : महानगरपालिका निवडणुकीसाठी ऐतिहासिक ठराव मंजूर
पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जर सुयोग्य, चारित्र्यसंपन्न, आणि गुणवत्तापूर्ण उमेदवार दिले नाहीत, तर आमचे स्वतःचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू, असा ठराव चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित विचारमंथन बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.
बोऱ्हाडेवाडी येथील ऐश्वर्यम बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत सुमारे 2000 प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. महानगरपालिकेच्या कारभारात सोसायटीधारकांचा सक्रिय सहभाग असावा, ही भावना यावेळी ठळकपणे व्यक्त झाली.
संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन यांनी स्पष्ट केले, "आमची संस्था अराजकीय असूनही, शहराच्या विकासात आमच्या 90% सोसायटीधारकांचा सहभाग असावा अशी जनभावना आहे. म्हणूनच संवाद दौरे घेऊन आम्ही सर्वसामान्यांची मते जाणून घेणार आहोत आणि मगच निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत."
विचारमंथन बैठकीतील प्रमुख मुद्दे :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील आघाडीची महानगरपालिका असूनही, उपलब्ध आर्थिक स्रोतांचा उपयोग शहर विकासासाठी प्रभावीपणे होत नाही. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत निर्णयप्रक्रियेत सोसायटीधारकांचा फारसा सहभाग नाही. शहराच्या नियोजनात, मूलभूत गरजांमध्ये आणि धोरणनिर्धारण प्रक्रियेत सोसायटीधारकांची भूमिका असावी, हा विचार अधोरेखित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, फक्त प्रेक्षकाची भूमिका न घेता फेडरेशनने प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असा सूर अनेक सदस्यांनी मांडला. त्यासाठी सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून, पुढील दिशा ठरवण्यासाठी संवाद दौऱ्यांद्वारे लोकमताची चाचपणी केली जाईल. पुढील काही आठवड्यांत चिखली, मोशी, चऱ्होली तसेच इतर परिसरांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये संवाद दौरे राबवून, विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर एकत्रित निर्णय घेऊन, योग्य ते उमेदवार उभे करण्याची तयारी फेडरेशनने दर्शवली आहे.
प्रतिक्रिया :
"आमची चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन ही अराजकीय सहकारी संस्था असली, तरी आम्ही सामाजिक भान ठेवून काम करत आहोत. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात आणि नियोजन प्रक्रियेत 90% सोसायटीधारकांचा सक्रिय सहभाग असावा, हीच आमची भूमिका आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाग घेण्याबाबत कोणताही निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. आम्ही प्रत्येक सोसायटीत जाऊन संवाद दौरे घेणार आहोत, नागरिकांची मते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर सर्वसंमतीने पुढील दिशा ठरवू. जर राजकीय पक्षांनी सुयोग्य, चारित्र्यसंपन्न उमेदवार दिले नाहीत, तर आम्ही आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यास मागेपुढे पाहणार नाही."
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.