पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग आयोजित श्रीसूक्त, भोंडला व रासदांडिया हा पारंपरिक उत्सव दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसेविका समिती पौरोहित्य समूहाच्या श्रीसूक्त पठणाने झाली आणि वातावरण प्रसन्न झाले. महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. अनघा कानडे यांनी समूहाच्या वतीने सौ. सुनंदा अनंतपुरे यांचा सत्कार केला.
यावेळी कार्याध्यक्षा अश्विनी अनंतपुरे व सहकार्याध्यक्षा वैदेही पटवर्धन यांच्या कार्यकाळाचा समारोप झाला. त्यांच्या कार्याचा गौरव करत सौ. अनघा कानडे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच नवीन कार्यकारिणीत निवड झालेल्या सौ. हर्षदा पोरे व समृद्धी पैठणकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यानंतर हत्तीच्या मूर्तीची पूजा करून पारंपरिक भोंडला खेळण्यात आला. सौ. उज्ज्वला जाधव व सौ. मधुरा कुलकर्णी यांच्या गाण्यांना महिलांनी उत्साहाने साथ दिली. पुढे गरबा व रासदांडिया खेळ रंगला. झगमगत्या पोशाखात महिलांनी दांडियाचा थरार अनुभवत नृत्याचा जल्लोष केला.
स्पर्धेचे परीक्षण नेहा साठे व रश्मी दाते यांनी केले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी कोंडेकर यांनी तरतरीत शैलीत केले.
समारोपाला कचोरी व बालूशाही या स्वादिष्ट खिरापतीचे वाटप करण्यात आले. १०५ महिलांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत आनंदमय वातावरण निर्माण केले.