पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागाने ४ व ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला ‘आनंद मेळावा’ यशस्वीपणे संपन्न झाला. दिवाळीपूर्व खरेदीचा उत्साह आणि परंपरेचा गोडवा यांचा संगम घडवणारा हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, निगडी येथे पार पडला. नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
मेळाव्यात सौंदर्य प्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, ड्रेस मटेरियल, घरगुती खाद्यपदार्थ, गृहसजावट आणि शोभेच्या वस्तू तसेच मेंदी आर्ट व मनोरंजन स्टॉल्स यांसह एकूण ४० ते ४२ स्टॉल्स ठेवले होते. नागरिकांनी या स्टॉल्सवर मोठ्या संख्येने खरेदी केली, तसेच स्टॉल्समध्ये ठेवलेल्या कुपनांमधून लकी ड्रॉ आयोजित केला गेला, ज्यात तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
उद्घाटन नीता देशपांडे यांनी केले. त्या स्वतः प्रशिक्षक असून अनेक महिलांना लघु उद्योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलेले आहे. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी महिला उद्योजकतेवर भर देत स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचे महत्त्व सांगितले. संपूर्ण मेळाव्याचे नियोजन वीणा महाजन व वैदेही पटवर्धन यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने केले, ज्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
हा मेळावा केवळ खरेदीचा उपक्रम नव्हता; नागरिकांनी स्थानिक उत्पादित व स्वनिर्मित वस्तू खरेदी करून महिला उद्योजकांना थेट प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे स्त्रीशक्तीला सशक्त आधार मिळाला आणि समाजात त्याचा प्रेरणादायी प्रभाव पडला.
‘आनंद मेळावा’ हा दिवाळीपूर्व उत्सव केवळ खरेदी-विक्रीपुरता मर्यादित न राहता, समाजघटकांना प्रेरणा देणारा, स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि परंपरेला नव्या अर्थाने उजाळा देणारा उपक्रम ठरला.