पिंपळे सौदागरमध्ये श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भव्य 70 फुटी ‘रावण दहन’ सोहळ्यातून सामाजिक संदेश


शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन मार्फत आयोजित भव्य ‘रावण दहन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला जनसागराची उपस्थिती..

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : आपल्या प्राचीन परंपरेचे स्मरण करत आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्यानिमित्त, पिंपळे सौदागर येथे नगरसेवक मा. शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘रावण दहन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी प्रचंड उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष (जिल्हा) श्री.शत्रुघ्न सिताराम काटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या 'महाराष्ट्रातील सर्वात मोठा' रावण दहन सोहळ्याला पिंपरी- चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा गोविंद यशदा चौक, नेक्सा शोरूम समोर,बीआरटी रोड, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आला होता.

श्री शत्रुघ्न काटे यांनी या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांना स्मरण करून केला गेला.

या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे,आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे,माजी आमदार अश्विनी जगताप, पवना सह बँक व्हा.चेअरमन श्री जयनाथ काटे यांच्यासह नगरसेवक - नगरसेविका, पदाधिकारी तसेच राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पिंपळे सौदागर परिसरातील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कृतिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी झाली. कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओच्या ग्रुपने विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांना थिरकवले. तसेच, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले सुनील अनिल तिलकधारी, हिसार (हरियाणा) यांनी साकारलेले हनुमान पात्र तसेच त्यांच्या टीम मार्फत महाकाल यांच्यावर आधारित नृत्य  लक्षवेधी ठरले.

या सोहळ्याला नामवंत कलावंतांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये लोकप्रिय गायक अवधूत गांधी, मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर,"मना" चे श्लोक चित्रपट फेम अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तारिणी सिरीयल फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे यांचा समावेश होता. या कलाकारांचे विशेष सादरीकरण उपस्थितांसाठी पर्वणी ठरले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी आणि आयोजकांनी दसरा सणाचे खरे महत्त्व विशद केले. केवळ रावणाचा पुतळा नव्हे, तर आपल्या मनातील 'आतला रावण' जाळण्याची गरज आहे, असा विधायक सामाजिक संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

"अहंकार, द्वेष, मत्सर आणि सामाजिक विषमता यांसारख्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करून बंधुभाव आणि विधायकतेला महत्त्व द्यावे," असे आवाहन यावेळी करण्यात आले. तरुणांनी व्यसनाधीनता सोडून विधायक कामांमध्ये सक्रिय व्हावे, असा सल्लाही मान्यवरांनी दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि संदेशांची सांगता झाल्यानंतर, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असणाऱ्या भव्य ‘रावण दहन’ सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. रावणाच्या पुतळ्याचे दहन होताच, नागरिकांनी एकच जयघोष करत विजयाचा क्षण साजरा केला.

पिंपरी चिंचवड, पुणे शहर मधील सर्वात मोठे रावण दहन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे, नागरिकांचे, पोलीस प्रशासनाचे, वाहतुक विभाग प्रशासन,अग्निशामक दल तसेच पालिका अधिकारी वर्ग यांचे आयोजक मार्फत आभार व्यक्त करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. 

शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या यशस्वी आयोजनामुळे हा सोहळा पिंपरी-चिंचवडमधील एक अविस्मरणीय आणि अर्थपूर्ण पर्व ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अँकरिंग) चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय मोरे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने