मराठवाडा जनविकास संघाकडून १००० हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना मदत

 


 शालेय साहित्यासाठी समाजाने पुढे येण्याचे अरुण पवार यांचे आवाहन 

पिंपरी चिंचवड - मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये 'सेवा हीच ईश्वर पूजा' या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पुरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावा-गावांत जाऊन वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश आहे.



 बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात देवगाव ( खुर्द) व वाघेगव्हाण या गावांमध्ये तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले, शाहुराज कदेरे, युवराज माने, बाळासाहेब काकडे, संजय माने, गोकुळ शितोळे, संतोष भोरे, गणेश गंगा विठ्ठल, विवेक पाटील, सुशांत क्षीरसागर, अशोक भोरे, शंकर तांबे, संतोष तांबे, मनोज मोरे, चंद्रकांत मोरे, सतीश मुरकुटे, सूर्यकांत कुरूलकर, दत्तात्रय धोंडगे, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, सुग्रीव पाटील, बळिराम कातंगळे, अनिताताई पांचाळ, केशव बोधले, गोविंद तांबवडे, रंगनाथ आवारे, लक्ष्मण जाधव, जीवन बोराडे, कृष्णा जाधवर, सचिन स्वामी, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले.



विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी 'शालेय साहित्य' मदतीची गरज :

पूरग्रस्त भागात अन्नधान्य व कपडे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला, तरी परिस्थिती पाहता आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे. पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको, या विचारातून मराठवाडा जनविकास संघाने आता 'मन आणि बुद्धी पोसली पाहिजे' या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे. अरुण पवार यांनी विविध देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे. येत्या ८ ते १०  ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, स्टेशनरी यासारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो रवाना होणार आहे. नागरिकांनी या 'यज्ञात फूल न फुलाची पाकळी' म्हणून आपल्या इच्छेने मदत अरुण कन्स्ट्रक्शन कार्यालय, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जमा करावी, असे आवाहन अरुण पवार यांनी केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळे गुरव येथील नवचैतन्य हास्ययोग परिवार शाखा क्र. ७०चे शाखाप्रमुख मारुती घुगे आणि संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, उपाध्यक्ष चांदमल सिंघवी, कार्याध्यक्ष पोपटराव चव्हाण, अरुण चौधरी, दामोदर राणे, अविनाश सोरटे, कुंभार गुरुजी आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने