पिंपरी चिंचवड - पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस थांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भा अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी सतीश गव्हाने यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी याठिकाणी जावे लागते. मात्र, नियमित बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. या मार्गांवर बस सुरू झाल्यास नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान, मागणीची दखल घेऊन या मार्गांवर नागरिकांची सोय व्हावी यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन पीएमपीएमएल प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
