- विश्वविक्रमी ‘रिव्हर सायक्लोथॉन-2025’ ची तयारी सुरू
- अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड - पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन इंद्रायणी नदीकाठी पुन्हा एकदा सायकलची चाके फिरणार आहेत. “इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमे” अंतर्गत आयोजित “रिव्हर सायक्लोथॉन-2025” या भव्य उपक्रमात यंदा तब्बल ३५ हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत. हा उपक्रम रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथून सुरू होईल, अशी माहिती अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. “एक पाऊल भावी पिढीसाठी” हे या मोहिमेचे ब्रीदवाक्य असून, नागरिकांमध्ये पर्यावरण व आरोग्याविषयी जनजागृती घडविणे हा मुख्य हेतू आहे.
या सायक्लोथॉनमध्ये 5, 15 आणि 25 किमी असे तीन ट्रॅक असून सर्व वयोगटातील सायकलप्रेमींना सहभागी होता येणार आहे. सहभागींसाठी प्रमाणपत्र, टी-शर्ट, मेडल, कॅप, बाटली आणि स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाने यापूर्वीच ‘Longest Chain of Cyclists’ साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला असून, यंदा विक्रमी 35 हजार सायकलपटूंच्या सहभागामुळे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश आणखी प्रभावीपणे समाजात पोहोचणार आहे.
प्रतिक्रिया :
“इंद्रायणी नदी ही आपल्या संस्कृतीची आणि जीवनाची ओळख आहे. तिचे संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून अभिमानाची बाब आहे. ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ मधून 35 हजार सायकलपटू एकत्र येऊन स्वच्छतेचा, आरोग्याचा आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश देणार आहेत. युवकांचा उत्साह आणि समाजाचा सहभाग पाहता, आपण नक्कीच ‘स्वच्छ नदी – हरित भविष्य’ हे स्वप्न साकार करू.”
- डॉ. निलेश लोंढे, अविरत श्रमदान.
