आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन



सोसायटी फेडरेशनचा पुढाकार : अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती

पिंपरी-चिंचवड : आमदार महेश लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त चिखली–मोशी–चऱ्होली–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत भूमी सिल्व्हेरिओ सोसायटी, लक्ष्मी चौक, मोशी येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या पार्श्वभूमीवर फेडरेशनने हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले की, “सध्या विविध रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन रक्तदान केल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त फेडरेशन तर्फे हे शिबिर आयोजित केले असून, शहरातील सर्व सोसायटीधारकांनी सहभागी होऊन या सामाजिक कार्यात हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले.

रक्तदान शिबिरासाठी शहरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

प्रतिक्रिया : 

“रक्तदान ही केवळ सेवा नसून ती एखाद्या व्यक्तीला नवजीवन देण्याची संधी आहे. शहरातील सर्व सोसायट्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरात सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. फेडरेशन पुढेही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत राहील.”

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन.

थोडे नवीन जरा जुने