टपरी, पथारी, हातगाडी कष्टकरी महिलांवर दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरित रद्द करा!


जप्त केलेला माल परत द्या, सखोल चौकशी करा – टपरी पथारी हातगाडी पंचायत

पिंपरी चिंचवड – थेरगाव येथील ढाकणे-काळेवाडी रोडवर दिनांक ८ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने २०० ते २५० फळभाजी विक्रेत्यांवर केलेली बेकायदेशीर कारवाई आणि त्यानंतर छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्यासह कष्टकरी महिलांवर दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरित रद्द करावा, जप्त केलेला माल परत द्यावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केली आहे.

या प्रकरणी डॉ. बाबा कांबळे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले असून, गोरगरीब कष्टकऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कष्टाच्या घामाने कमावलेला माल जप्त झाल्यानंतर तो परत मागणे हा कोणताही गुन्हा नव्हे, तर मूलभूत हक्क आहे. तरीही “सरकारी कामात अडथळा” असे खोटे कलम लावून धनाजी येळकर पाटील यांच्यासह कष्टकरी महिलांवर गुन्हा दाखल करणे हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा स्वतःच्या चुकीचा पडदा टाकण्याचा डाव असल्याची टीका डॉ. कांबळे यांनी केली.

घटनेतील तपशील :

- दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रहाटणी फाटा येथे नोंदणीकृत, परवाना प्रलंबित पथविक्रेते (१५-२० वर्षांपासून व्यवसाय करणारे) यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

- या विक्रेत्यांनी महापालिकेकडे नोंदणी शुल्क भरले असूनही दोन वर्षांपासून परवाने वाटप केले नाहीत.

- हॉकर्स झोन, नॉन-हॉकर्स झोन जाहीर न करता व केंद्र सरकारचा निधी विक्रेत्यांच्या सोयींसाठी खर्च न करता त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे – ही कारवाई मुळात बेकायदेशीर आहे.

- जप्त माल परत देण्याची मागणी करणाऱ्या कष्टकऱ्यांना “सरकारी कामात अडथळा” असे कलम लावून दिनांक ९ नोव्हेंबर दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

- छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी घटनास्थळी येऊन अन्याय थांबवण्याची विनंती केली असता, त्यांच्यावरही हाच गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्त्वाचे मुद्दे :

1. हॉकर्स झोन जाहीर न करता कारवाई करणे बेकायदेशीर.

2. परवाना प्रलंबित असतानाही नोंदणीकृत विक्रेत्यांवर कारवाई अन्यायकारक.

3. जप्त माल परत मागणे = सरकारी कामात अडथळा? – हे तर्कशुद्ध नाही.

4. गुन्हा दाखल होण्यास २४ तास उशीर – कोणाच्या सांगण्यावरून?

5. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आकसाने कारवाई – स्वाभिमानी चळवळ दाबण्याचा प्रयत्न.

पंचायतची भूमिका :

डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले की,  

आम्ही कायद्याला व संविधानाला मानणारे आहोत. रस्त्यावरची लढाई व कायदेशीर मार्ग – दोन्ही आम्ही लढू. अशा खोट्या कारवाईने आमचा आवाज दाबला जाणार नाही. तीव्र आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात लवकरच केले जाईल.

मागण्या :

1. धनाजी येळकर पाटील यांच्यासह सर्व कष्टकऱ्यांवर दाखल गुन्हे त्वरित रद्द करा.  

2. जप्त केलेला सर्व माल (फळभाज्या, साहित्य) तात्काळ परत द्या.  

3. या प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींकडून सखोल चौकशी करा.  

4. हॉकर्स झोन जाहीर करून पथविक्रेत्यांना हक्काची जागा व परवाने द्या.

संपर्क :

डॉ. बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी पथारी हातगाडी पंचायत  




थोडे नवीन जरा जुने