उत्पत्ती कार्तिकी एकादशी दिनी हरिनाम जयघोष ; इंद्रायणी काठ भाविकांचे गर्दीने फुलला
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे ३ लाखावर भाविकांनी हरिनाम गजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने साजरी केली. या निमित्त आळंदीत ग्राम दिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद झाला. परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. आळंदी मंदिरात पहाट पूजा मंगलमय वातावरण धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. रांगोळीचे लक्षवेधी रेखाटनाचे भाविकांनी कौतुक केले. मंदिरासह महाद्वारात पुष्पसजावट भाविकांचे लक्षवेधी ठरली.
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांचे आळंदीत हरिनामाचा जयघोषात भाविक भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाले. आळंदीत सुरु असलेल्या विविध ठिकाणी तसेच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम नाम हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गावर भाविक चिंब झालेले दिसले. टाळ-मृदंगाचे नादाने अवघी अलंकापुरी नगरी दुमदुमून गेली. आळंदीत स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाने पहाट पूजे दरम्यान स्वच्छता सेवा रुजू केली. यासाठी अध्यक्ष सुनील तापकीर, महिला विंग प्रमुख आशा तापकीर यांचे सह सेवकांनी परिसर स्वच्छ करीत सेवा रुजू केली. दरम्यान घंटा नाद होताच मंगलमय सनई चौघडाचे वाद्य वादनात मंदिरात पहाट पूजा अंतर्गत ११ ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रोच्चारात पवमान अभिषेक झाला. मंदिरातील मंगलमय वातावरण, भक्तिमय उत्साह, सुरु असलेली आकर्षक फुलांची सजावट यामुळे परिसर सुगंधीत झाला. माऊलींच्या गाभाऱ्यात श्रींचे संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा झाली. यात दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावत पोशाखात केशरी मेखला, शाल, सोनेरी मुकुट ठेवताचा श्रींचे आकर्षक रूप सजले. यात लक्षवेधी आभूषणे, सोने,चांदीचे छत्र चामरे, विविध लक्षवेधी रंगातील पोशाख बांधीत तुळशीहार, फुलांचा वैभवी हार अर्पण होताच श्रींचे वैभवी सजलेले रूप भाविकांनी आपले नेत्रात साठविले. श्रींची आरती होताच परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले.
श्रींचे पहाट पूजेस खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज कबीरबुवा लोंढे, रोहिणी पवार, खेडचे प्रांत अनिल दौडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक चोपदार बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, योगेश आरु, मंगेश आरू, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील, उपायुक्त दत्तात्रय लांघी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, भीमा घुंडरे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी दिनी लाखो भाविकानी श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी श्रींचे मंदिरात दर्शन घेत कार्तिकी यात्रेचा आढावा घेतला. या वेळी आळंदी देवस्थान तर्फे त्यांना सत्कार करण्यात आला.
पंढरीहूनी हे मूळपीठ ! जुनाट पै वैकुंठ l पूर्वी येथे होते निळकंठ ! ब्रह्मविष्णूरुद्रइंद्र ll६ll
अनेक भाविकांनी मंदिर प्रदक्षिना करीत स्थान माहात्म्य जोपासले, श्रींचे मंदिराचे कलश दर्शन घेत कार्तिकी वारीस हजेरी लावली. आळंदीत ग्राम प्रदक्षिणा करीत श्रींचे पालखी तसेच श्री संत नामदेवराय यांचे श्री लक्समिनारायण विष्णू मंदिरात दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्री पांडुरंगराय यांचे पालखीचे गोपाळपुरातील वैभवी श्री मारुती देवस्थान ट्रस्ट चे भव्य प्रांगणात श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. पालखीचे दर्शन व्यवस्था साठी मारुती देवस्थानचे अध्यक्ष अप्पा महाराज पवार आणि सर्व विश्वस्त मंडळाने परिहराम पूर्वक चोख नियोजन केले. अनेक भाविकांनी दर्शनास वैतागेश्वर महाराज यांचे मंदिरा मागील दर्शन बारीतुन जात दर्शन घेतले. सुमारे ३लाखावर भाविकांची आळंदी कार्तिकी यात्रेस हजेरी असल्याचे जाणकार सांगतात. दर्शनबारीत भाविकांची मोठी गर्दी होती. मात्र यावर्षीची यात्रा कमी असल्याचे व्यापारी सांगतात.
श्रींचे नामजयघोषात राज्यातून आलेल्या दिंड्याची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा केल्या. इंद्रायणी घाटावर स्नानास भाविकांची गर्दी केली होती. दरम्यान दिंड्यादिंड्यातून खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंगाचे वाद्य वादनात इंद्रायणी नदी घाटावर भाविक वारकरी, महिला यांचे सांप्रदायिक खेळ रंगले. यात फुगडी आदींचा समावेश होता. अनेक संतांचे पादुका पालखी मिरवणूक, नगरप्रदक्षिणा श्री विठ्ठल, माउली तुकाराम जयघोषात झाल्या. सर्वत्र शहरात ज्ञानोबा माऊलीचा, हरिनामाचा जयघोष सुरु असताना श्रींची पालखी तसेच श्री नामदेवरायांची पालखी देखील नगरप्रदक्षिणा मार्गावर हरिनाम गजरात आल्या. हजेरी मारुतीमंदिरात परंपरेने थांबून हरिनाम गजरात अभंग आरती होऊन श्रींची पालखी मंदिरात पुन्हा प्रवेशली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने यावर्षी ही कार्तिकी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास त्रिवेणी आश्रम ते श्री क्षेत्र आळंदी या मार्गावर श्री गुरुदेवांच्या पादुकांचा पालखी सोहळा सुमारे २५० पेक्षा जास्त साधकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, महाराष्ट्र, आर्ट ऑफ लिव्हिंग त्रिवेणी आश्रम, मरकळ यांनी या सोहळ्याचे आयोजन उत्साहात हरिनाम गजरात केले.
यावर्षी माऊलींचे पहाट पूजेस बसण्याचा मान दर्शनबारीतील प्रथम वारकरी दाम्पत्य ठाणे येथिल वारकरी परिवारास मिळाला. आळंदी देवस्थान ने या दाम्पत्यांचा सत्कार श्रींचे गाभा-यात श्रींची प्रतिमा, शाल, पुषार व श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी त्याची या पुढील जीवन प्रवास असाच सुरळीत सुरु रहावा, श्रींचे गाभा-यात प्रथम दर्शनार्थी मान मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगत हि वार्ता त्यांनी आपल्या परिवारास सांगितले. समाधान व्यक्त केले. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य क्षेत्रोपाध्ये मंदार जोशी, राहुल जोशी, राजाभाऊ चौधरी, तुषार प्रसादे, श्रीरंग तुर्की, विलास गांधी, शंतनू पोफळे, आदित्य तुर्की, श्रीनिवास कुलकर्णी, निखिल प्रसादे, संजय प्रसादे, आनंद जोशी, कैवल्य गांधी आदींनी वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली.
आळंदीत कार्तिकी यात्रे निमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा विविध भाविक, व्यक्ती , दानशूर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते देत असतात. आळंदीतील श्री गुरु आंबेकर आजरेकर फड येथे हरिनाम सप्ताह, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत तसेच अनेक धर्मशाळा, संस्था येथे दरवर्षी परंपरेने समाधी सोहळ्याचा उत्सव परंपरेने सुरु आहे. या साठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहे. येथे मोहन महाराज शिंदे, अमोल महाराज जाधव, माउली महाराज जाधव यांचे मार्गदर्शनातं कीर्तन , प्रवचन, धार्मिक कार्यक्रम सोहळ्यात सुरु आहे. यामध्ये अन्नदान, फराळ वाटप सेवा हजारो भाविकांना अन्नदान सेवा रुजू झाली.
