पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडनेशनचा पुढाकार : अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : चिखली–मोशी–चऱ्होली–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन व विठ्ठल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, तुपे वस्ती (पुणे–नाशिक हायवे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसीय सर्व रोग निदान आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे शिबिर रविवार दिनांक १४ डिसेंबर ते रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी पद्मभूषण डॉ. गिरीशजी प्रभुणे व कामगार नेते सचिन भैय्या लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, स्त्रीरोग तपासणी, मणक्याचे व हाडांचे आजार, बालरोग, त्वचारोग, जनरल मेडिसिन आदी विविध आजारांची मोफत तपासणी तसेच माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर शिबिरस्थळी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करत आहेत.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी परिसरातील विविध सोसायट्यांमधील तब्बल ३७९ नागरिकांनी तपासणी करून उपचार घेतले. पुढील सात दिवस हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांच्या आरोग्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा.” आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, येत्या दिवसांतही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया :
“पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे फेडरेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या सर्व रोग निदान शिबिरामध्ये कॅन्सरसह विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असल्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी दर्जेदार तपासणी व उपचार मिळत आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.
