Maharashtra Municipal Corporations Election Announced : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी आजपासून राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही विकासकाम, नवीन घोषणा, बदली आदेश किंवा शासकीय निधीचा वापर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही.
या निवडणुकांमध्ये राज्यातील 3 कोटी 48 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी प्रमुख महानगरपालिकांचा यात समावेश आहे.
महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांत सत्ताधारी व विरोधकांमध्ये थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शांततेत, निर्भय आणि पारदर्शक मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, पुढील काही आठवड्यांत प्रचार, उमेदवार निवड आणि युती-आघाड्यांचे गणित अधिक स्पष्ट होणार आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या या रणधुमाळीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
.png)