Maharashtra Local Body Election Update : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या काही भागातील निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, यासंदर्भात आयोगाकडून अधिकृत पत्रकही जारी करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. उमेदवारांची चाचपणी, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आज होणारी घोषणा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
याशिवाय, मतदार यादीमधील घोळाबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर आयोगाकडून कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. काही भागांमध्ये मतदार नोंदणी, नावांची वजावट किंवा दुबार नावे यासंदर्भात तक्रारी समोर आल्या असून, यावर आयोगाची भूमिका काय असते हे पत्रकार परिषदेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकूणच, आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमुळे राज्यातील महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत आराखडा समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह सामान्य नागरिक आणि मतदार यांच्यासाठीही आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
.png)