![]() |
PCMC : महानगरपालिका, पिंपरी, दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी,पिंपळे निलख, वाकड व संलग्न परिसरामध्ये मनपा अग्निशमन केंद्राची स्थापना अशा मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दापोडी ते वाकड या संपूर्ण पट्ट्यामध्ये लोकसंख्या, बहुमजली निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, पेट्रोल–CNG स्टेशन, LPG गोडाऊन, मल्टिप्लेक्स, हॉटेल व्यवसाय इत्यादी अत्यावश्यक व उच्च-जोखमीच्या घटकांची घनता लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.
सदर परिसरात आजतागायत एकही मनपा अग्निशमन केंद्र उपलब्ध नसून, BRT मार्ग, मेट्रो मार्ग, रेल्वे लाईन व कायमस्वरूपी वाहतूक कोंडीमुळे विद्यमान अग्निशमन केंद्रांहून घटनास्थळी पोहोचण्यास अनावश्यक विलंब होतो. परिणामी आग, अपघात, पूर, जंगल/गवत आग इत्यादी आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या जीवित व वित्तसुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता, नमूद परिसरासाठी तातडीच्या प्राथमिकतेने मनपा अग्निशमन केंद्र स्थापन करून आवश्यक कर्मचारी, वाहने व उपकरणे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, अशी नाना काटे यांनी मागणी केली आहे.
