राष्ट्रवादी बरोबरच जायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला?

 


 शिवसेना जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांचा सवाल 

 पिंपरी चिंचवड - महाविकास आघाडी बाबत आमचा कोणताही संभ्रम नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे चर्चेला महाविकास आघाडीबरोबर न बसता अजित पवार यांच्यासोबत बसतात. असेच करायचे होते तर मग महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.

  महापालिका निवडणुकी संदर्भात आकुर्डी, शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, युवा सेनेचे नेते चेतन पवार, उप जिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मणियार,  रोमी संधू, अनिता तुतारे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

    बैठकीनंतर पत्रकारांनी सचिन अहिर यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, आमची पहिली अंतिम यादी रविवारी सायंकाळी सहा ते सात वाजता किंवा फार तर सोमवारी पक्षप्रमुखांचा आदेश घेऊन जाहीर होईल.

     महाविकास आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याबाबत विचारले असता सचिन अहिर म्हणाले की, आमचा याबाबत कोणताही संभ्रम नाही. राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्याबरोबर जाता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका आम्ही मांडली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून एकत्र आले तर आम्ही बरोबर आहोत. मात्र शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे चर्चेला महाविकास आघाडी बरोबर न बसता अजित पवारांबरोबर बसतात. पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. अजित पवारांशी चर्चा करायची होती तर मग महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला असा संतप्त सवाल सचिन आहेर यांनी केला. काँग्रेस, मनसे आणि अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जात आहोत. वंचित बहुजन आघाडीशीही चर्चा केली जाणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने