Indian railway : २००७ साली स्थापन झालेली रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF) आज भारतातील सर्वात प्रगत प्रवासी डबा निर्मिती युनिटपैकी एक म्हणून उदयास आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आतापर्यंत १,३१० डबे तयार करण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, १५ डिसेंबर रोजी MCF ने आपला १५,००० वा रेल्वे डबा तयार केला. मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आतापर्यंत MCF ने एकूण १,३१० डबे तयार केले आहेत.”
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील लालगंज येथे २००७ मध्ये स्थापन झालेली ही फॅक्टरी भारतातील अत्याधुनिक प्रवासी डबा निर्मिती केंद्रांपैकी एक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
₹३,१९२ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १,००० डबे इतकी आहे. ही फॅक्टरी कानपूर–रायबरेली रोडवर, लालगंजपासून अवघ्या ३ किमी अंतरावर असून लखनऊपासून सुमारे ८५ किमी दूर आहे.
MCF मधील पहिला पूर्णतः इन-हाऊस तयार केलेला डबा ऑगस्ट २०१४ मध्ये बाहेर आला. त्यानंतर उत्पादनात सातत्याने वाढ होत गेली असून २०१४-१५ मध्ये १४० डब्यांवरून २०२४-२५ मध्ये विक्रमी २,०२५ डबे तयार करण्यात आले, जे MCF च्या इतिहासातील सर्वाधिक उत्पादन आहे.
आतापर्यंत तयार झालेल्या १५,००० डब्यांपैकी ७,००० वातानुकूलित (AC) तर ८,००० अवातानुकूलित (Non-AC) डबे आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.
या डब्यांमध्ये हमसफर, तेजस, अंत्योदय, दीनदयाळू, भारत गौरव, ब्रेक व्हॅन, पार्सल व्हॅन, ट्रॅक रेकॉर्डिंग कार, इकॉनॉमी कोच, मोझांबिकसाठी डेमो लोकोमोटिव्ह व होल्ड कोच, MEMU कोच आदी विविध प्रकारच्या रोलिंग स्टॉकचा समावेश आहे.
“सर्व डबे ठरवून दिलेल्या दर्जा मानकांचे काटेकोर पालन करून तयार करण्यात आले असून प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवास मिळावा याची खात्री करण्यात आली आहे,” असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
