आजकाल जंगलतोड, वाढती नागरीकरण आणि मानवी वस्ती जंगलांच्या जवळ येत असल्यामुळे बिबट्यांचे मानवी परिसरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे माणसाला बिबट्यापासून होणारा धोका काही प्रमाणात वाढलेला दिसतो. मात्र योग्य काळजी आणि जनजागृती केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो.
बिबट्यामुळे होणारा सध्याचा धोका
1. मानवी वस्तीत प्रवेश – अन्नाच्या शोधात बिबट्या शेती, गाव, औद्योगिक परिसरात येऊ शकतो.
2. अचानक हल्ल्याची शक्यता – एकट्या व्यक्तीवर, विशेषतः रात्री किंवा पहाटे हल्ला होऊ शकतो.
3. लहान मुले व वृद्ध अधिक धोक्यात – दुर्बल व्यक्तींवर धोका तुलनेने जास्त असतो.
4. जनावरांवर हल्ले – पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यास भीतीचे वातावरण निर्माण होते.
बिबट्यापासून बचाव कसा करावा
1. रात्री एकटे फिरणे टाळा – विशेषतः शेतात, उसाच्या मळ्यात किंवा जंगलालगतच्या भागात.
2. समूहात फिरा – शक्यतो एकट्याने न जाता दोन-तीन जणांसोबत रहा.
3. प्रकाशाची व्यवस्था ठेवा – घराभोवती, रस्त्यावर आणि शेतात लाईट लावा.
4. लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवा – संध्याकाळनंतर बाहेर सोडू नका.
5. कचरा उघडा ठेवू नका – त्यामुळे कुत्रे, डुकरे येतात व बिबट्याला आकर्षण होते.
6. बिबट्या दिसल्यास शांत रहा – पळापळ किंवा आरडाओरडा करू नका, हळूच मागे सरका.
7. वनविभागाला त्वरित कळवा – बिबट्याचे दर्शन किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती द्या.
8. अफवा पसरवू नका – चुकीच्या बातम्यांमुळे घबराट वाढते.
निष्कर्ष
बिबट्या हा सहसा माणसांवर हल्ला करणारा प्राणी नाही; तो स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा भुकेपोटीच हल्ला करतो. त्यामुळे घाबरण्यापेक्षा योग्य खबरदारी, संयम आणि प्रशासनाशी सहकार्य केल्यास बिबट्यापासून होणारा धोका निश्चितपणे कमी करता येईल. मानव आणि वन्यजीव यांचा समतोल राखणे ही आजची गरज आहे.
बिबट्या (Leopard) बद्दल माहिती
बिबट्या ,बिबळ्या किव्हा वाघरू (Leopard) हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.
बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात. चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.
बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.
महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात, यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.
इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात.
बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे, हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात. रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची (ॲन्टिलोप्सची) शिकार करतात. बिबट्याची चावण्याची क्षमता ही सिंह व वाघ यांच्या पेक्षा कमी असते म्हणजे एखाद्या तगड्या जवान बिबट्या ची चावण्याची क्षमता ही ३०० ते ३५० पि एस आय इतकी असते.
महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खेडेगावात ऊसाच्या शेतात बिबटे आढळून येत आहेत. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत. म्हणून मादा बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसुती करत आहेत. जे की फार धोकादायक आहे. काही वन अभ्यासकांनी या बिबट्यांना शुगरकेन बिबट्या असे नामकरण केले आहे.
-लेखक - किशोर आण्णासाहेब थोरात
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ(मानवाधिकार)
संपर्क:८७९६८२४६८२

