पुणे (रफिक शेख) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या मतमोजणी कार्यक्रमाबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यात मतमोजणीची प्रक्रिया दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जुन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला होता. या अहवालात जुन्नर शहरामध्ये मतमोजणीच्या दिवशी नियमितपणे आठवडे बाजार भरत असून, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तसेच विजयी उमेदवारांच्या मिरवणुका बाजारातून जाण्याची शक्यता असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करण्यात आले होते.
सदर बाबींचा विचार करता नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ ची मतमोजणी प्रक्रिया शांततेत, न्याय्य आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जुन्नर शहरासह पुणे जिल्ह्यातील मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याची खात्री जिल्हादंडाधिकाऱ्यांना झाली आहे.
त्याअनुषंगाने मुंबई मार्केट अँड फेअर अॅक्ट, १८६२ मधील कलम ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध मुंबई मार्केट अँड फेअर अॅक्ट, १८६२ मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
