भाजपामध्ये ज्यांच्या उमेदवारीवर ‘फुली’, त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दारे ‘खुली’

 


- पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश

- पाच सर्व्हेमध्ये अपयशी ‘बॅकबेंचर्स’ना भाजपाचा 'STRICT NO'

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पाच व्यापक सर्व्हे राबवले. या सर्व्हेचा उद्देश केवळ तिकीट वाटप नव्हता, तर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणारे, निवडून येण्याची क्षमता असलेले आणि प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करणारे उमेदवार पुढे आणणे हाच होता. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर ‘फुली’ मारली होती. आता भाजपा- राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याचे निश्चित झाल्यानंतर संबंधित इच्छुकांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून राष्ट्रवादीत प्रवेशाचा पर्याय निवडला आहे.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक इच्छुकांची बैठक झाली. त्याठिकाणी भाजपाकडून निवडून आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सीमा सावळे यांच्यासह अन्य पक्षांतील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कारण, भाजपाच्या यादीत त्यांची नावे नव्हती आणि पक्ष यंत्रणेतून त्यांना संपर्कही केला नाही. 

दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचा पहिला सर्व्हे आमदारांची कार्यप्रणाली व प्रभाव यावर आधारित होता. दुसरा सर्व्हे इच्छुक उमेदवारांची यादी आणि त्यांची तयारी तपासणारा होता. तिसऱ्या सर्व्हेमध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशीलता, जनसंपर्क, प्रभाव आणि पक्षासाठी त्यांनी आतापर्यंत काय योगदान दिले, याचा सखोल आढावा घेण्यात आला. चौथा सर्व्हे प्रभागनिहाय डाटा संकलन, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संभाव्य लढतींचा अभ्यास करणारा होता.

तर पाचवा आणि निर्णायक सर्व्हे थेट निवडून येण्याची क्षमता यावर केंद्रित होता. या पाचही सर्व्हेमध्ये ज्यांना आपली प्रगती, प्रभाव किंवा विजयी होण्याची क्षमता दाखवता आली नाही, अशा व्यक्तींना भाजपाच्या पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्वाने स्पष्टपणे बाजूला ठेवले. हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय, केवळ वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि राजकीय वास्तव लक्षात घेऊन घेण्यात आला.

निवडणूक आचारसंहिता लागू होताच भाजपातील काही तथाकथित ‘बॅकबेंचर्स’ यांनी घाईघाईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याचे चित्र दिसून आले. विशेष बाब म्हणजे, ज्या-ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीकडे तुल्यबळ किंवा प्रभावी उमेदवार नव्हते, त्या प्रभागांमध्ये भाजपातील माजी नगरसेवकांसाठी राष्ट्रवादीने दारे खुली केली. यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षाशी दीर्घकाळ प्रामाणिक राहून काम करणाऱ्या उमेदवारांच्या तिकीटांवर गदा आली असून, आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली जात असल्याची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया : 

“भाजपामध्ये तिकीट म्हणजे कृपा नव्हे, तर कर्तृत्वाची पावती असते. पाच सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभाग, प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे काम मोजले आहे. जे पक्षाशी प्रामाणिक राहिले, ज्यांनी संघटन वाढवले आणि ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच भाजपाची संधी मिळेल. तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांमुळे भाजपाची दिशा बदलत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा विजय हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावरच निश्चित होणार आहे.”

- कुणाल लांडगे, प्रवक्ता, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने