River conservation : उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प दृष्टीक्षेपात!



- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची निविदा प्रसिद्ध

पिंपरी चिचंवड :  पिंपरी चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना आणि वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान इंद्रायणी यांच्या संवर्धन व स्वच्छतेसाठी हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी नदी सुधार प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सातत्याने पाठपुरावा करणारे आणि विषयाला गती देणारे नेतृत्व म्हणून आमदार महेश लांडगे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी ५२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर, आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) पवना व इंद्रायणी नद्यांच्या संवर्धनासाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या विविध निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे उगम ते संगम पवना व इंद्रायणी दोन्ही नद्यांच्या किनारी आवश्यक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), मलनि:सारण योजना, प्रदूषण नियंत्रण व नदी पुनरुज्जीवनाची कामे समाविष्ट आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी “नमामी इंद्रायणी” व पवना नदी सुधार प्रकल्पचा विषय सातत्याने शासन दरबारी मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. 

विशेष म्हणजे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांना अभिप्रेत असलेला नदी सुधार प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने सुधारित DPR (Detailed Project Report) करण्यात आला असून, हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे जात आहे.

“नदी संवर्धन हा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा विषय नाही, तर नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,” अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. विधानसभा अधिवेशनांमध्ये सरकारचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच उगम ते संगम पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीनही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी नदी सुधार प्रकल्प आता दृष्टीक्षेपात आला आहे. 

प्रतिक्रिया : 

“पवना आणि इंद्रायणी या केवळ नद्या नसून, पिंपरी-चिंचवडच्या जीवनरेषा आहेत. या नद्यांचे संवर्धन आणि स्वच्छता हा राजकीय विषय नसून येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्याचा आणि शहराच्या शाश्वत भवितव्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाच्या सहकार्याने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहभागातून हा उगम ते संगम नदी सुधार प्रकल्प पीसीएमसी, पीएमसी आणि पीएमआरडीए  यांच्या माध्यमातून निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने