- मिशन–PCMC : उमेदवारी अर्ज मागे घेत अधिकृत उमेदवारांना भक्कम पाठिंबा
- भाजपा उमेदवार तथा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पक्षनिष्ठ उमेदवारांचे मानले आभार
पिंपरी चिंचवड - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी दाखविलेली पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक शिस्त लक्षवेधी ठरली आहे. “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या भूमिकेतून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रभाग क्रमांक २८ मधून निर्मलाताई कुटे, जयनाथजी नारायण काटे, कैलासजी प्रधान कुंजीर, सुप्रियाताई राजेश पाटील आणि रिनाजी दिनेश काटे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. मात्र, पक्षाचा अधिकृत निर्णय मान्य करत सर्वांनी अर्ज मागे घेतले असून, भाजपाच्या अधिकृत पॅनेलच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका घेतली आहे.
या निर्णयामुळे प्रभागात भाजपाचे मतविभाजन टळले असून, संघटनात्मक एकजूट अधिक बळकट झाली आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार तथा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पक्षनिष्ठ उमेदवारांचे मनापासून आभार मानत, या एकजुटीच्या बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये शत्रुघ्न काटे, अनिता काटे, कुंदा भिसे आणि संदेश काटे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून, इच्छुक उमेदवारांच्या या पाठिंब्यामुळे निवडणूक रणधुमाळीत भाजपाची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. पक्षशिस्त, संघटनात्मक ताकद आणि विकासाचा ठोस अजेंडा याच जोरावर मिशन PCMC यशस्वी करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे.
प्रतिक्रिया :
“प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि पक्षाने दिलेली जबाबदारी ही केवळ सन्मानाची नाही, तर मोठी जबाबदारी आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, कोणताही भेदभाव न करता प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देणे हाच माझा निर्धार आहे. भाजपाची विकासाभिमुख भूमिका आणि कार्यकर्त्यांची एकजूट याच्या बळावर शाश्वत विकासाचा संकल्प आहे.
- शत्रुघ्न काटे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 28, रहाटणी- पिंपळे सौदागर.

