राष्ट्रवादीला सत्ता द्या शहरातील सर्व प्रश्न सोडवू - अजित पवार

 


प्रभाग क्रमांक १९ चे राष्ट्रवादीचे पॅनल बहुमताने विजयी करा - अजित पवार 

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी रोजी घड्याळाचे चिन्ह पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जमुक्त करून शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल असे आस्वासन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पिंपरी येथील सभेत केले. 

   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे आयोजित केलेल्या सभेत अजितदादा पवार यांनी मतदारांना संबोधित केले.

     यावेळी आमदार रोहित पवार, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक धनराज आसवाणी, काळूराम पवार, कोमल मेवाणी, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे, युवा नेत्या कोमल शिंदे आदींसह परिसरातील मतदार बंधू, भगिनी आणि प्रभाग क्रमांक १९ चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) उपस्थित होते.

   यावेळी अजित पवार म्हणाले की, १९९२ पासून २०१७ पर्यंत पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मी केले. यावेळी कोणताही जातीभेद, धर्मभेद मी केला नाही. सर्व समाजातील उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन शहर विकासाचे काम केले. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारले, ग्रेड सेपरेटर, सर्विस रोड, पुणे मुंबई महामार्ग ६१ मीटर करणे, मेट्रोची परवानगी घेतली. स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त शहर ठेवण्यासाठी काम केले. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अनेक वेळा देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

 शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पवना नदीतून पाणीपुरवठा कोटा वाढवून घेतला भामा आसखेड धरणातून ज्यादा पाणी मंजूर करून दिले. अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांना सोबत घेऊन पदे देऊन सन्मान दिला. अनेकांना महापौर पद, स्थायी समितीचे अध्यक्ष पद दिले आणि तेच आता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, त्यांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी माजी महापौर अपर्णा डोके व संजोग वाघेरे आणि उषा वाघेरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

  २०१७ नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभारी बदलला या नव्या कारभाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटले अध्याप ही चार हजार कोटींची बिल देणे बाकी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी दहा हजार कोटी व्हायला पाहिजे होत्या. भाट नगर वसाहत मोडकळीस आली आहे. त्याचा पुनर्विकास केला पाहिजे. नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी टाटा कंपनीकडून वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी शहरवासीयांना दिले जावे यासाठी प्रयत्न करू.

 १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या. मी पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल. शहराला कर्जातून बाहेर काढून दर्जेदार विकासाचा वेग वाढवून, तरुण-तरुणींना रोजगार निर्मितीसाठी शिक्षण, प्रशिक्षण देऊ, उद्योग धंद्याला पोषक वातावरण निर्माण करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने