ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाची शपथ घेऊन येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा केला संकल्प....

 


ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह - मतदान तर करणारच शिवाय इतरांनी मतदान करावे यासाठी जनजागृती देखील करण्याचा निर्धार...

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महापालिकेतर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व मतदान जनजागृतीपर स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संत तुकाराम नगर येथील विरंगुळा केद्र येथे करण्यात आले होते.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात मतदान जनजागृतीपर विशेष पथनाट्य तसेच फ्लॅशमॉबचे सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी आणि मतदानाचा हक्क याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. तसेच उपस्थित शेकडो ज्येष्ठ नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

 यावेळी, “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी मतदानाची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

--- 

ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांनी मतदानाचा संकल्प करून दिलेला संदेश समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक सक्षम करावी.

— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

--- 

लोकशाहीची खरी ताकद ही सक्रिय मतदारांमध्ये असते. ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेली मतदानाची शपथ ही तरुण पिढीसाठी आदर्श ठरणारी आहे. निर्भय, निःपक्षपाती आणि शांततेत मतदान करून नागरिकांनी लोकशाहीच्या सुदृढतेस हातभार लावावा.

— ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

थोडे नवीन जरा जुने