!-- afp header code starts here --> सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या वतीने पुन्हा “एक हात मदतीचा” — शैक्षणिक मदत उपक्रम

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या वतीने पुन्हा “एक हात मदतीचा” — शैक्षणिक मदत उपक्रम

 


 Pune :समाजातील वंचित, गरजू तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या वतीने “एक हात मदतीचा” हा सामाजिक उपक्रम दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी राबविण्यात आला. हा उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व आश्रम शाळा, पिंपळदरी, ता. अकोले येथे पार पडला.

या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. एकूण ४५० शर्ट हे एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल तर्फे संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. किशोर थोरात यांनी उपलब्ध करून दिले. या मदतीमुळे अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी बोलताना श्री. किशोर थोरात यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरण मिळावे यासाठी शाळेसाठी किचन बांधकाम व पत्रा शेड उभारणीसाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी संस्थेची कार्यपद्धती सांगून, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आल्याचे नमूद केले.

या उपक्रमाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार तसेच पश्चिम भारत अध्यक्ष श्री. अमोल माने यांनी पुणे जिल्हा टीमचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शेळके सर यांनी केले, तर अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक  मलाव सर यांनी केले. यावेळी जगधने सर यांचीही उपस्थिती होती.

या उपक्रमासाठी देणगी स्वरूपात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे सदस्य  राजेंद्र भागवत यांचे बंधू  प्रकाश भागवत यांचे विशेष आभार मानण्यात आले.

कार्यक्रमास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अमित कोकणे, पुणे शहर जनरल सेक्रेटरी  रवींद्र आळणे व सदस्य  आशिष कदम उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अमित कोकणे यांनी विद्यार्थ्यांना १०वी नंतरच्या शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन केले, तर श्री. आशिष कदम यांनी पुढील शिक्षणाच्या विविध वाटा समजावून सांगितल्या. याप्रसंगी बोलताना पुणे शहर जनरल सेक्रेटरी श्री. रवींद्र आळणे म्हणाले की, “माझी गावाशी नाळ नेहमीच जोडलेली आहे आणि संस्थेच्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, याच शाळेत दिवाळी सणाच्या काळात संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ वाटप देखील करण्यात आले होते.

संस्थेच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, आपले छोटेसे योगदान देखील या मुलांच्या आरोग्य, सुरक्षितता व शिक्षणासाठी मोठा आधार ठरू शकते.

थोडे नवीन जरा जुने