PCMC : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागाची शैक्षणिक-सांस्कृतिक सहल संपन्न

 


पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ,निगडी महिला विभागातर्फे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी रामदरा (एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर – राजबाग) व थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर येथे एकदिवसीय शैक्षणिक-सांस्कृतिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत मंडळाच्या २० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सकाळी ६.३० वाजता प्राधिकरण येथून सहलीस प्रारंभ झाला. प्रथम रामदरा येथील प्राचीन मंदिर व निसर्गरम्य परिसरास महिलांनी भेट दिली. हिरवाईने नटलेला परिसर, तलाव व शांत वातावरणाचा अनुभव घेत महिलांनी मंदिर दर्शनाचा मनःपूर्वक आनंद घेतला. यावेळी छायाचित्रणासोबतच इडली-चटणी व बालुशाही या नाश्त्याचाही आस्वाद घेण्यात आला.

त्यानंतर सहलीचा पुढील टप्पा म्हणून एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर (राजबाग परिसर) येथे भेट देण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुग घडविणारे सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक व अभिनेते स्वर्गीय राजकपूर यांची राजबाग परिसराचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी व्हावा अशी इच्छा होती. त्यांच्या त्या इच्छेनुसार सामाजिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड यांनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची उभारणी केली आहे.

राजबाग परिसरातील विष्णू मंदिर, सप्तरंग कला दालन, सप्तऋषी आश्रम, विश्वशांती डोम, विश्वशांती संगीत कला अकादमी, गीता भवन, यज्ञकुंड व विश्वराज सागर आदी ठिकाणांना महिलांनी भेट दिली. तसेच राजकपूर स्टुडिओ संदर्भातील माहितीपूर्ण चित्रफीत पाहण्याची संधी मिळाली. राजकपूर यांची जुनी वास्तूही पाहण्यात आली. या सर्व स्थळांची सविस्तर माहिती श्री. मोहन नागरगोजे यांनी मार्गदर्शक म्हणून दिली. त्यानंतर महिलांनी कॉलेज कॅन्टीनमध्ये भोजनाचा आनंद घेतला.

दुपारनंतर सहलीच्या शेवटच्या टप्प्यात थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात सर्व महिलांनी दर्शन घेतले व एकत्रितपणे अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर परतीच्या प्रवासास प्रारंभ करून सायंकाळी ७.३० वाजता सर्व महिला सुखरूप प्राधिकरण येथे परतल्या.

ही सहल भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणारी, तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व निसर्गाशी नाते जोडणारा अविस्मरणीय अनुभव ठरल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.


थोडे नवीन जरा जुने