पिंपरी-चिंचवड महापौरपदावर भाजपाचाच झेंडा
रवि लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित
“पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल,” असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. आज भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काटे यांचे शब्द प्रत्यक्षात उतरले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचा महापौर निश्चित झाला असून उपमहापौरपदीही भाजपाचाच उमेदवार विराजमान होणार आहे.
भाजपाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या उमेदवारी अर्जावेळी आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी शत्रुघ्न काटे यांनी भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर शहरातील संघटनात्मक बांधणी मजबूत करत पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी शहरात करण्यात आली असून त्याचा सकारात्मक परिणाम थेट महापालिका निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे. अल्पावधीत शहर संघटन मजबूत करून भाजपला यश मिळवून देणारे नेतृत्व म्हणून शत्रुघ्न काटे यांची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे.
शत्रुघ्न काटे यांचे पुन्हा ‘समर्पण’ – भाजपासाठी किंगमेकर
महापौरपदासाठी इच्छुक असूनही शत्रुघ्न काटे यांना यावेळी संधी मिळाली नाही. २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर तसेच विधानसभा निवडणुकीत इच्छुक असतानाही त्यांना संधी न मिळाल्याचा अनुभव त्यांनी स्वीकारला. मात्र, पक्षाने दिलेली शहराध्यक्षपदाची जबाबदारी समर्पित भावनेने पार पाडत त्यांनी पुन्हा एकदा भाजपासाठी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाला शहरात एकहाती सत्ता मिळवून देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर महापौरपद भाजपकडेच राहील, असा विश्वास काटे यांनी व्यक्त केला होता, जो आज खरा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास सुरू असून हा विकासाचा वेग कायम ठेवण्याची जबाबदारी महापालिका सभागृह पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया :
“पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक नागरिकासाठी विकासाची गाडी थांबणार नाही. महापालिका सभागृहातून घेतले जाणारे निर्णय शहराच्या प्रगतीला दिशा देतील. मी महापौरपदासाठी इच्छुक होतो; मात्र संधी न मिळाल्याची कोणतीही नाराजी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोपवलेली शहराध्यक्षपदाची जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडणार आहे. समर्पण भावनेतून काम करणे हीच भाजपाची शिकवण आहे.”
— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड
